लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली
By हणमंत गायकवाड | Published: September 15, 2022 05:07 PM2022-09-15T17:07:55+5:302022-09-15T17:08:43+5:30
गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत.
लातूर : गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत दोन्ही बाजूंनी अनेक ठिकाणी अतिक्रमणे थाटली होती. याविरुद्ध आयुक्तांच्या आदेशानुसार गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कायमस्वरूपी थाटलेली दुकानेही पाडण्यात आली. आता फुटपाथने मोकळा श्वास घेतला आहे.
गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत. काँग्रेस भवन तसेच बसस्थानकाच्या बाजूला फुटपाथवर असलेल्या दुकानांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने हातोडा फिरविला. त्यामुळे आता हा रस्ता मोकळा झाला आहे. स्वत: आयुक्त अमन मित्तल अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन परिसरातील सहा ते आठ अतिक्रमित दुकाने हटविण्यात आली. या मोहिमेमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख रवि कांबळे यांच्यासह या विभागाचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी, अमजद शेख, समीर शेख, रिजवान मणियार, मैनोद्दीन शेख, धोंडिराम सोनवणे आदी मनपाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वत:हून अतिक्रमणे काढावीत
सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. उद्या शहरातील अन्य भागात असलेली अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. कारवाई करण्यापूर्वी संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.