नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात

By हरी मोकाशे | Published: August 11, 2023 01:10 PM2023-08-11T13:10:22+5:302023-08-11T13:11:10+5:30

नवमतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष अभियान

Dharashiv's team is in Latur for search of new voters | नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात

नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात

googlenewsNext

लातूर : मतदार यादीत नाव नोंदणी अथवा दुरुस्ती करायची म्हटल्यास इच्छुकांपुढे बीएलओ सापडतील का? अथवा ऑनलाईनरित्या करता येईल का असे विविध प्रश्न निर्माण होतात. मात्र, जिल्ह्यातील एकही नव मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तेथील निवडणूक विभागाचे एक पथक लातुरात येऊन धाराशिव जिल्ह्यातील नवमतदारांची नोंदणी करीत आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील १८- १९ वयोगटातील मतदारसंख्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार यादीत कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील पात्र मतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात राज्यात लातूरचा लौकिक असल्याने येथे परजिल्ह्यातील विद्यार्थी ११ वी व १२ वीच्या शिक्षणासाठी येतात. विशेषत: धाराशिव जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे वास्तव्य लातुरात आहेत. १८- १९ वयोगटातील नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार लोहाराचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जणांचे पथक लातूरला दाखल झाले आहे. हे पथक येथील विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला भेटी देऊन नवमतदारांची नोंदणी करीत आहे.

पथकात सहा तालुक्याचे कर्मचारी...
लोहाराचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकात तुळजापूर, धाराशिव, भूम, परंडा, कळंब आणि वाशी तालुक्यातील अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक अशा १२ जणांचा समावेश आहे. हे पथक दिवसभर शहरातील विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला भेटी देऊन धाराशिव जिल्ह्यातील नवमतदारांची नोंदणी करीत आहे.

आतापर्यंत दीडशे जणांची नोंदणी...
लातुरातील विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला भेटी देऊन धाराशिव जिल्ह्यातील १८- १९ वयोगटातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहोत. आतापर्यंत १५० नवमतदारांची नोंदणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील नवमतदारांनी आपला फोटो, आधारकार्ड अथवा टीसीची झेरॉक्स देऊन नोंदणी करावी.
- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार.

Web Title: Dharashiv's team is in Latur for search of new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.