भर पावसात लातूरात अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे धरणे आंदोलन
By हरी मोकाशे | Published: July 25, 2024 05:12 PM2024-07-25T17:12:57+5:302024-07-25T17:13:49+5:30
लातूर जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा
लातूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजारांची तर मदतनीसांच्या मानधनात साडेसात हजार रुपयांची वाढ करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी भर पावसात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी जोरदार घोषणा दिल्या.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी व एकरकमी सेवा समाप्तीचा लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर मासिक पेन्शन देण्यात यावी. कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या सुट्ट्या नंतर देण्याचे शासनाने मान्य केले होते. या कर्मचाऱ्यांच्या २५ सुट्ट्या अजून थकित आहेत. आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे त्या काळातील मानधन देण्यात यावे. दहावी उत्तीर्ण मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
डेप्युटी सीईओंना साकडे...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. अशा पावसात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलन केले.