महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन
By हरी मोकाशे | Published: September 23, 2022 04:34 PM2022-09-23T16:34:46+5:302022-09-23T16:34:58+5:30
यापूर्वी लातूर, उदगीर, निलंगा अशा दहाही ठिकाणच्या पंचायत समितीसमोर युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते.
लातूर : उदगीर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी एन. ए. पटवारी व ग्रामसेवक व्ही.एम. साळुंखे यांचे झालेले निलंबन हे चुकीचे आहे. ते मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी एक दिवसीय धरणे व असहकार आंदोलन सुरू आहे.
यापूर्वी लातूर, उदगीर, निलंगा अशा दहाही ठिकाणच्या पंचायत समितीसमोर युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदसमोर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम, राज्य कायदा सल्लागार देविदास चव्हाण, विभागीय अध्यक्ष दिलीप पांढरे, सचिव सखाराम काशीद, जिल्हाध्यक्ष आनंत सूर्यवंशी, सरचिटणीस श्याम मुस्के, नागनाथ रायफळे, नितीन भोईबार, प्रशांत ढगे, रवींद्र कुटवाडे, दिपा जगताप सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, राज्य बाजार समितीचे संतोष सोमवंशी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.