मधुमेह, धुम्रपान, कमी वजन; लातूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्ती क्षयरोगाच्या अतिजाेखमीत!

By हरी मोकाशे | Published: August 6, 2024 12:46 PM2024-08-06T12:46:22+5:302024-08-06T12:46:48+5:30

लातूर जिल्ह्यात गृहभेटीतून १६ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

diabetes, smoking, low weight; Half three lakh people in Latur district are at high risk of tuberculosis! | मधुमेह, धुम्रपान, कमी वजन; लातूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्ती क्षयरोगाच्या अतिजाेखमीत!

मधुमेह, धुम्रपान, कमी वजन; लातूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्ती क्षयरोगाच्या अतिजाेखमीत!

लातूर : मधुमेह, धुम्रपान, कमी वजन अशा कारणांमुळे जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील ३ लाख २८ हजार ५०६ व्यक्ती क्षयरोगाच्या अति जोखमीच्या कक्षेत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे अतिजोखमीतील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी सर्वस्तरीय अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांना मोफत गोळ्या- औषधी देण्यात येतात. तसेच पोषक आहारासाठी शासनाकडून आर्थिक मदतही दिली जाते. शिवाय, जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने निक्षय मित्र बनवून अन्नदाता उपक्रम राबविला आहे. दरम्यान, क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली. जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने सहा निकषानुसार जिल्ह्यात नुकतेच १८ वर्षांपुढील अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात १५ लाख ६६ हजार ९८८ व्यक्तींची माहिती घेण्यात आली असता ३ लाख २८ हजार ५०६ जण अतिजोखीम गटात आढळले आहेत.

लातुरात सर्वाधिक जोखीमग्रस्त व्यक्ती...
अहमदपूर - २८६९७
औसा - ४४८४७
चाकूर - २५२६०
देवणी - १६०९९
जळकोट - १२९०६
निलंगा - ३९२४२
रेणापूर - १९५८१
शिरुर अनं. - १७०७४
उदगीर - ३५७६९
लातूर - ८९०३१

सहा निकषांअधारे जिल्ह्यात सर्वेक्षण...
मागील पाच वर्षांत टीबी झाला होता का, मागील तीन वर्षांत टीबी रुग्णाच्या सहवासात असलेल्या व्यक्ती, मधुमेह, धुम्रपान, वजन कमी असलेली व्यक्ती आणाि ६० वर्षांपुढील व्यक्ती अशा सहा निकषांच्या आधारे गृहभेटीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

क्षयरोगाचे सध्या जिल्ह्यात १६०३ रुग्ण...
सध्या जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ६०३ रुग्ण आहेत. त्यांना शासनाच्या वतीने मोफत गोळ्या- औषधी देण्यात येत आहेत. तसेच सकस आहारासाठी शासनाकडून रक्कमही दिली जात आहे. त्याचबरोबर निक्षय मित्रांच्या माध्यमातून पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

क्षयरोगाचा संसर्ग थुंकी, खोकल्यातून...
क्षयरोगाचा संसर्ग हा थुंकी, खोकल्यामुळे हवेतून होतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, काखेत अथवा मानेभोवती गाठ येणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची लवकरात लवकर तपासणी करुन उपचार करणे महत्त्वाचे ठरते.

जिल्ह्यात लवकरच लसीकरण मोहीम...
अतिजोखमीतील व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना मोफत बीसीजी लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या दाेन वर्षांनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे आढळून येईल.
- डॉ. एस.एन. तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.

Web Title: diabetes, smoking, low weight; Half three lakh people in Latur district are at high risk of tuberculosis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.