डायल @ ११२ हेल्पलाईनवर खोडसाळपणाने खुनाचा कॉल; किनगाव ठाण्यात एकाविरोधात गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: March 25, 2024 06:24 PM2024-03-25T18:24:57+5:302024-03-25T18:25:17+5:30
माहिती मिळताच सहायक फौजदार कल्याणे, सुनील श्रीरामे यांच्यासह इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
किनगाव (जि. लातूर) : पोलिस दलाच्या डायल @ ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर सताळा गावात खून झाल्याचा कॉल आला. याची माहिती तातडीने संबंधित किनगाव पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र, अशी घटनाच घडली नसल्याचा प्रकार समोर आला. हा कॉल कोणीतरी खोडसाळपणाने केला असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, आपत्कालीन सेवेसाठी पोलिसांनी सुरु केलेल्या डायल @ ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर एका व्यक्तीने रविवारी रात्री १०:१४ मिनिटाला कॉल केला. अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक खून झाला आहे, अशी माहिती सांगून कॉल कट केला. याची माहिती हेल्पलाईनवर सेंटरवरून किनगाव ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच सहायक फौजदार कल्याणे, सुनील श्रीरामे यांच्यासह इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सताळा गावात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले. याबाबत गावचे पोलीस पाटील बालिका उपगंडले, ग्रामस्थ सुदर्शन उपगंडले, अविनाश काळे, मुस्तफा शेख यांच्याकडेही पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, त्यांनीही गावात अशी घटना घडली नसल्याचे सांगितले. हा प्रकार कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणाने केला आहे, हे स्पष्ट झाले.
याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल सुनील श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शासकीय तक्रार सुविधा डायल @ ११२ क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिल्याप्रकणी कलम १७७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास किनगाव ठाण्याचे पोलिस करीत आहेत.