अडचणीत बिनधास्त डायल करा ११२; लातुरमध्ये चार्ली पोलिसांची पेट्रोलिंग २४ तास राहणार !
By हणमंत गायकवाड | Published: June 22, 2023 07:45 PM2023-06-22T19:45:20+5:302023-06-22T19:45:47+5:30
मोटारसायकलच्या संख्येत वाढ, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत
लातूर: चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी मोटारसायकलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सायरन, अलौसिंग सिस्टीम, वाकीटॉकीसह कम्युनिकेशनसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. चार्ली पोलिस पेट्रोलिंग शहरात २४ तास राहणार आहे. त्या अनुषंगाने २४ पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
लातूर शहरांमध्ये चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग यापूर्वी होती. मात्र, कामगिरी व त्याचे फायदे लक्षात येऊनही यंत्रणा सक्षम नव्हती. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी चार्ली पोलिस पेट्रोलिंगची कामगिरी लक्षात घेता, ही पद्धत अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंगच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सहा मोटारसायकली होत्या. आता १२ झाल्या आहेत. चार्ली पोलिस पेट्रोलिंग शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये २४ तास राहणार आहे. त्या मोटारसायकलवर आळीपाळीने ड्युटीकरिता एकूण २४ पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार्ली पोलिस पेट्रोलिंग अधिक प्रभावी व्हावी याकरिता चार्ली मोटारसायकलवर पेट्रोलिंग व नेमण्यात आलेले पोलिस अंमलदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून सायरन, अलाैंसिंग सिस्टीम तसेच रात्रीच्यावेळी चार्ली मोटारसायकल लवकर ओळखू यावी, याकरिता लाल व निळ्या रंगाची ब्लिंकर्स लाईट लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे चार्ली पोलिस पेट्रोलिंग मोटारसायकलला एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता येऊन अलाैसिंग सिस्टीम करून सूचना देता येणार आहेत तसेच चार्ली पेट्रोलिंगवरील पोलिस अंमलदार यांच्याकडे स्वयंचलित शस्त्र व वायरलेस वाॅकीटाकी राहणार आहे. चार्ली पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या पोलिसांना एकमेकांशी संपर्क करता येणार आहे. चार्ली पेट्रोलिंगद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महिलांना, लहान बालकांना व वयोवृद्धांना त्वरित मदत मिळणार आहे.
मदत हवी असल्यास ११२ वर करा डायल....
ट्रॅफिक जाम, भांडण, तक्रारी, अनुचित घटना घडत असताना डायल ११२ वर कळविल्यावर लगेच चार्ली पोलीस पेट्रोलिंगची मोटारसायकल त्या ठिकाणी पोहोचणार आहे. अडचणी सापडलेल्या लोकांनी डायल ११२ वर कॉल करून मदत मागितल्यास चार्ली पोलीस पेट्रोलिंग त्वरित पोलिस अंमलदार त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. नागरिकांनी त्यांना पोलिस मदत पाहिजे असल्यास त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ११२ असे टाईप करून कॉल केल्यास त्यांना तत्काळ चार्ली पोलीस पेट्रोलिंगकडून मदत पुरविण्यात येणार आहे.