मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत लातुरात ९ जुलै रोजी संवाद रॅली

By आशपाक पठाण | Published: June 23, 2024 08:11 PM2024-06-23T20:11:39+5:302024-06-23T20:11:56+5:30

नियोजन बैठक : रॅली लक्षवेधी करण्याचा निर्धार

Dialogue rally on July 9 in Latur in the presence of Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत लातुरात ९ जुलै रोजी संवाद रॅली

मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत लातुरात ९ जुलै रोजी संवाद रॅली

आशपाक पठाण/ लातूर : सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागण्या मार्गी लावण्यासाठी १३ जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ९ जुलै रोजी भव्य मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार आहे. रॅली लक्षवेधी करण्याचा निर्धार रविवारी सकल मराठा समाजाच्या नियोजन बैठकीत करण्यात आला.

येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात बैठक झाली. बैठकीची सुरुवात लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमापुजनाने व जिजाऊ वंदनेने झाली. मराठा समाजाची परिस्थिती हलाखीची झाली असून अनेकांना रोजचा दिवस जड झाला आहे. हाती पैसा नसल्याने व शेतीतून अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने मुलां-मुलींना शिक्षण देणे व घरगाडा चालवणे कठीण झाले आहे.

कर्जाचा डोंगर हटत नसल्याने समाजबांधव आत्महत्या करीत आहेत. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्वांतून बाहेर येण्यासाठी आरक्षण हाच समर्थ पर्याय असून ते मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा. सगेसोयरेची तत्काळ अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, सातारा, निजाम गॅझेटच्या संदर्भाने मराठा समाजास कुणबी म्हणून मान्यता द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

गावा-गावात होणार बैठका...
मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर ९ जूलैची रॅली असून ती अभूतपूर्व व लक्षवेधी करण्यासाठी योगदान देण्याचे ठरले. गावा-गावात बैठका घेणे, प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधणे, समाजमाध्यमातून संपर्क ठेवणे ,वाहनांचे नियोजन करणे, स्वयंसेवक, रॅली दरम्यान पाणी , प्राथमिक वैद्यकीय तसेच अन्य सुविधा आदींवर या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. ९ जुलै रोजी होणाऱ्या या रॅलीची सुरुवात, मार्ग व समारोप याबाबत स्वंतत्र बैठक घेण्यात येणार असून लवकरच त्याची माहिती देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Dialogue rally on July 9 in Latur in the presence of Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.