आरोग्य कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसाठी डिगाेळ उपकेंद्रास ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:15+5:302021-04-27T04:20:15+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत डिगोळ आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला दैठणा, तळेगाव दे., सुमठाना, डिगोळ, सोनारवाडी ...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत डिगोळ आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला दैठणा, तळेगाव दे., सुमठाना, डिगोळ, सोनारवाडी ही गावे जोडण्यात आली आहेत. सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. परंतु, येथील उपकेंद्रातून सुविधा अपुऱ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे रुग्णांना खासगी वाहनाने उदगीर, नळेगाव, लातूर गाठावे लागते.
शासकीय उपकेंद्र असतानाही येथे आरोग्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे उपकेंद्राची दुरवस्था होत आहे.
उपकेंद्राचे दरवाजे व्यवस्थित बसत नाहीत. दरवाजे दोरीने बांधावे लागतात. विद्युत सोय नाही. पाणी नाही. या समस्या दूर कराव्यात. तसेच कायमस्वरूपी दोन आरोग्य कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी उपसरपंच बाबासाहेब पाटील यांनी केली. या मागण्यांसाठी सोमवारी टाळे ठोकण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबासाहेब पाटील, ग्रामपंचात सदस्य संजय बिरादार, उमाकांत स्वामी, पोलीस पाटील महेश पाटील, राहुल कांबळे, दिनकर टाकळगावे, अंकुश बिरादार, जनक बिरादार, भाऊसाहेब बिरादार, सतीश एकुरगे, राजकुमार बिरादार, संजय वाडकर, लहू बिरादार, श्रीमंत शेळके, रामजी वाडकर, माधव लोंढे, शिवाजी दासरे, आदी उपस्थित होते.