प्रवाशांच्या दिमतीला खिळखिळ्या बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:21+5:302021-08-12T04:24:21+5:30
निलंगा आगारात सध्या ८४ बस असून त्यातील १४ गाड्या दुरुस्तीसाठी विभागीय आगाराकडे पाठविल्या आहेत. २० बसची आयुर्मर्यादा संपुष्टात आल्याने ...
निलंगा आगारात सध्या ८४ बस असून त्यातील १४ गाड्या दुरुस्तीसाठी विभागीय आगाराकडे पाठविल्या आहेत. २० बसची आयुर्मर्यादा संपुष्टात आल्याने त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. पावसाळ्यात गळती लागले. प्रवाशांना अशा बसमधून प्रवास करावा लागत आहे. सध्या चांगल्या अवस्थेत २१ तर उत्तम अवस्थेत १५ बस आहेत.
निलंगा आगारास आतापर्यंत केवळ ४ शिवशाही व एक विठाई निमआराम बस मिळाली आहे. निमआरामाच्या बस कमी असल्यामुळे मुंबई, भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, शिर्डी या लांब पल्ल्याच्या बस नाईलाजास्तव बंद करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी, प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी दोन एशियाड एसटी बस येथे होत्या. मात्र, त्यांची आयुर्मर्यादा संपल्यामुळे त्या विभागीय आगारास परत पाठविण्यात आल्या. त्यानंतर नवीन बस मिळाल्या नाहीत.
निलंगा आगाराने उत्पन्नात मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्याबरोबर उत्पन्न वाढीसाठी प्रवाशांना चांगली सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी हिरकणी बसची आवश्यकता आहेत, असे आगार प्रमुख युवराज थडकर म्हणाले.
इंधनाचे दर वाढल्याने स्वत:ची खाजगी वाहने परवडत नाहीत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अथवा खरेदीला जाण्यासाठी हिरकणीसारख्या बसची सेवा मिळणे आवश्यक आहे. ही सेवा मिळाल्यास खाजगी वाहतुकीला आळा बसेल. तसेच व्यापारी व प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असे येथील व्यापारी एच.के. सिंग म्हणाले.