पावसामुळे सहा दिवसांपासून रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:20+5:302021-09-27T04:21:20+5:30

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या ...

Discharge of water from Rena project for six days due to rains | पावसामुळे सहा दिवसांपासून रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

पावसामुळे सहा दिवसांपासून रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

Next

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे आणि अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी, परळी तालुक्यातील मुरंबी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांत रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे प्रकल्पातून पहिल्यांदा ७ सप्टेंबर रोजी ६ दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा जास्त होत असल्याने पुन्हा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ४ दरवाजे व सायंकाळी ६ दरवाजे उघडून १५८.७० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर २२ व २३ सप्टेंबर रोजी १० ते ३० सेमीने आणि २४ सप्टेंबर रोजी १० ते २० सेमीने व २५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले.

रविवारी सकाळी ७.३० वा. पुन्हा ४ दरवाजे १० सेमीने उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. आतापर्यंत रेणा प्रकल्पातून ४० दलघमी एवढा पाण्याचा विसर्ग झाला आहे. या पाण्यामुळे रेणा नदी दुथडी भरुन वाहत आहे तर नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळ हे तिन्ही बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनदा विसर्ग...

रेणा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २१.६ दलघमी आहे. ६ दिवसांत प्रकल्पातून ४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणा मध्यम प्रकल्प हा दोनदा भरेल एवढा जलसाठा नदीपात्रात सोडून देण्यात आला असून इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रेणा मध्यम प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

४० दलघमी पाणी सोडले...

२२ सप्टेंबरपासून प्रकल्पात येवा मोठ्या प्रमाणात होत आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत ४० दलघमी पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाण्याचा येवा सुरु असल्याने आणखीन पाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया चालू- बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Discharge of water from Rena project for six days due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.