आरोग्य विभागातही लातुर पॅटर्नची चर्चा; गडचिरोली झेडपीच्या पथकाचा पाहणी, अभ्यास दौरा
By हरी मोकाशे | Published: June 28, 2023 01:55 PM2023-06-28T13:55:34+5:302023-06-28T13:56:28+5:30
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी म्हणून राबविण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत आहे पथक
लातूर : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्यवर्धिनीची अंमलबजावणी तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांची दखल घेऊन पंतप्रधानांच्या हस्ते लातूर जिल्ह्यास राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले होते. त्यामुळे येथे राबविण्यात येत असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेण्याबरोबरच त्याचा अभ्यास करण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे. हे पथक आरोग्यवर्धिनीसह विविध आरोग्य संस्थांना भेट देऊन माहिती घेत आहे.
या पथकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डावल साळवे यांच्यासह सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी, आरोग्य वर्धिनी सल्लागार, तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी स्वागत केले. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी म्हणून राबविण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. बाळासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती. या पथकाने पाखरसांगवी आरोग्य वर्धिनीसह अन्य आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. हे पथक ३० जूनपर्यंत आरोग्य केंद्रांचा अभ्यास करणार आहे.
उत्कृष्ट सेवा देण्यासाठी अभ्यास...
गडचिरोली जिल्ह्यात २५० आरोग्यवर्धिनी केंद्र असून हा जिल्हा आदिवासी बहुल आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अधिक उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी लातूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी व अभ्यास करीत आहोत.
- डॉ. डावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी.