वाद सासऱ्याचा अन् जीव गेला जावयाचा; शेतीच्या वादातून चाकूने भाेसकून खून
By राजकुमार जोंधळे | Published: May 20, 2023 01:39 PM2023-05-20T13:39:37+5:302023-05-20T13:40:08+5:30
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे
रेणापूर (जि. लातूर) : शेतीच्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने भाेसकून खून करण्यात आल्याची घटना समसापूर शिवारात शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी तिघांना रात्री उशिरा अटक केली आहे. सतीश श्रीमंत जमादार असे मयत तरुणाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, सतीश श्रीमंत जमादार (वय ३२) हे गत सहा वर्षांपासून पत्नी, मुलांसह समसापूर येथे सासरे बळीराम खोडके यांच्याकडे वास्तव्याला हाेता. सासरे बळीराम खोडके यांची समसापूर शिवारात शेती आहे. त्यांच्या बांधालगत भारत निवृत्ती फुलसे यांचीही शेती आहे. खोडके आणि फुलसे यांचा समाईक बांधावरून रेणापूरच्या न्यायालयामध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, सतीश जमादार आणि सासरे खोडके, मेहुणा महादेव बळीराम खोडके हे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेतात टॅक्टरद्वारे माती सपाट करण्याचे काम करत होते. यावेळी भारत फुलसे, शाम ऊर्फ बाळू फुलसे यांनी सतीश जमादार यांना शिवीगाळ करत बांधाजवळ माती टाकायची नाही, असे सांगितले. यावेळी जमादार यांनी तुम्ही शिव्या देऊ नका, असे म्हणाले असता, शाम फुलसे यांनी सतीश जमादार यांचे तोंड दाबले, तर भरत फुलसे याने चाकूने पोटात भोसकले. यावेळी गयाबाई फुलसे यांनी धक्काबुकी केली, तर सतीशची पत्नी निर्मला, सासू सावित्राबाई यांनाही गयाबाई फुलसे हिने काठीने मारहाण केली. जखमी सतीश जमादार यांना मेहुणा महादेव खोडके यांच्यासह नातेवाइकांनी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी लातूरला हलविण्यास सांगितले. लातुरात उपचार सुरू असताना सतीश जमादार यांचा दुपारी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात महादेव खोडके यांच्या फिर्यादीवरून भारत फुलसे, मुलगा शाम ऊर्फ बाळू भारत फुलसे, पत्नी गयाबाई भारत फुलसे (सर्व रा. समसापूर) यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
अनेक वर्षांपासून धुमसणारा वाद उठला जावयाचा मुळावर !
सतीश जमादार हा समसापूर येथील बळीराम खोडके यांचा जावई होता. तो सासरवाडी समसापूर येथेच सध्याला वास्तव्याला हाेता. दरम्यान, शेतीचा वाद सासरे आणि शेजारी असलेले भरत फुलसे यांच्यामध्ये सुरू हाेता. गेल्या अनेक वर्षांपासून धुमसणाऱ्या वादानेच जावयाचा जीव घेतला. सासऱ्याच्या वादात शुक्रवारी जावयाचा जीव गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.