उपकेंद्रातील आरोग्यसेवा विस्कळीत; एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदचा फटका
By हरी मोकाशे | Published: November 23, 2023 05:47 PM2023-11-23T17:47:30+5:302023-11-23T17:48:10+5:30
मागण्यांसाठी जवळपास तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन सुरु आहे
लातूर : शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एनएचएमच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी जवळपास तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील १५३ उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रुग्णांना किरकोळ आजारासाठीही खाजगी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी. कुठल्याही रुग्णांची गैरसाेय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेअंतर्गत ५० आरोग्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र आहेत. उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे अधिकारी प्रसूतीपूर्व व प्रसूती दरम्यान गरोदर माता व बालकांना सेवा देतात. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तपासणी व उपचार, संसर्गजन्य आजार तपासणी व उपचार, कुटुंब नियोजन मार्गदर्शन, नेत्र, दंत, कान- नाक- घसा तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार, आपत्कालिन वैद्यकीय सेवा देतात. त्यामुळे खेड्यातील रुग्णांची सोय होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गतच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत कायम करावे, शासकीय पदांप्रमाणे वेतन व हक्क द्यावेत, या मागण्यांसाठी जवळपास तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे, तर कायम असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.
एनएचएमअंतर्गत एकूण ८२६ कर्मचारी...
एनएचएमअंतर्गत जिल्ह्यात एकूण ८२६ कर्मचारी आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी, एएनएम अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी १५३ समुदाय आरोग्य आरोग्य अधिकारी, ४० वैद्यकीय अधिकारी तसेच एएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, टेक्निशयन असे एकूण ५३७ कर्मचारी काम बंद आंदोलनात होते. तर पूर्वपरवानगीने २१ कर्मचारी रजेवर होते.
शासनाने मागण्यांची पूर्तता करावी...
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून आम्ही आरोग्य सेवा देत आहोत. त्यामुळे शासनाने आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करुन घ्यावे, या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन मागण्यांची पूर्तता करावी.
- डॉ. शिवाजी गोडगे, जिल्हाध्यक्ष, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण...
राष्ट्रीय आराेग्य अभियानअंतर्गतच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्रातील एएनएम, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडला आहे. तसेच काही प्रमाणात रुग्ण तपासणी नोंदणी संख्याही घटली आहे. आम्ही उपलब्ध मनुष्यबळावर आरोग्य सुविधा पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. बालाजी बरुरे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी.
एकूण कंत्राटी कर्मचारी - ८२६
पूर्वपरवानगीने रजेवर - २१
आंदोलनात सहभागी - ५३७
सध्या कार्यरत - २६८