जि. प. शाळेत निघाला साप, मुले म्हणाली, अरे बाप रे बाप..!
By राजकुमार जोंधळे | Published: September 30, 2023 07:41 PM2023-09-30T19:41:36+5:302023-09-30T19:42:40+5:30
सर्पमित्र शिक्षकाने प्रबाेधनातून विद्यार्थ्यांची घालवली भीती...
लातूर : तालुक्यातील सेलू (बु.) नवीन वसाहत येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील वर्गखाेलीत साप शिरताना विद्यार्थ्यांनी पाहिला अन् अचानकपणे सर्प दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच गाेंधळ सुरू झाला. यावेळी सायकल खेळत शाळेच्या प्रांगणात आलेल्या गावातील आदर्श कांबळे, अनिल कांबळे यांनी सापाला पाहिले. याची माहिती शाळेत असलेले शिक्षक विष्णू चाकुंदे यांना दिली. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
हा प्रसंग पाहून शिक्षक चाकुंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता केंद्र प्रमुखच सर्पमित्र असल्याने बालाजी काेळी यांना फाेन केला. गुरुजी आपल्या शाळेत भला माेठा साप आला आहे. तुम्ही तातडीने या, असे म्हटले. यावेळी सर्पमित्र काेळी यांनी सापाला मारू नका, गाेंधळ करू नका, मी अवघ्या पंधरा मिनिटात शाळेत पाेहोचताे. लातूर येथून केंद्रप्रमुख बालाजी काेळी हे काही वेळामध्ये शाळेत दाखल झाले. विद्यार्थी, शिक्षकांनी त्यांना साप दाखविला. यावेळी त्यांनी शाळा परिसरात असलेल्या सापाला पकडले. त्याला एका बरणीमध्ये अलगदपणे बंद केले. अचानकपणे सर्पदर्शन झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील ग्रामस्थांनी शाळा परिसरात एकच गर्दी केली हाेती.
सापाबद्दल मनामध्ये असलेले गैरसमज दूर...
शाळेत भरदुपारी भलामाेठा, लांबच लांब साप पाहून विद्यार्थी घाबरले हाेते. शिवाय, गावातील पालक, ग्रामस्थही गाेंधळलेल्या स्थितीत शाळेच्या आवारात थांबले हाेते. दहा-पंधरा मिनिटांमध्ये बाभूळगाव येथील केंद्रप्रमुख, सर्पमित्र बालाजी काेळी यांनी सापाला काही वेळात पकडले. त्याला एका बरणीत बंद केले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. साप हा मानवाचा शत्रू नसून ताे मित्र आहे. सापाबद्दल मनात असलेले गैरसमज प्रबाेधन करून त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. साप दिसल्यानंतर त्यास न मारता सर्पमित्राला बाेलावून घ्यावे. ते पकडतील आणि त्याला दूर जंगलात नेऊन साेडतील. या सर्व प्रबाेधनानंतर गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा जीव भांड्यात पडला.