दुष्काळी अनुदानाचे वाटप करा; प्रहारचे जलसमाधी आंदोलन
By हरी मोकाशे | Published: February 12, 2024 05:24 PM2024-02-12T17:24:35+5:302024-02-12T17:25:14+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक : रेणा प्रकल्पात उतरले
रेणापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी अनुदानाचे वाटप करण्यात यावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात उतरुन जलसमाधी घेण्याचे आंदोलन करण्यात आले. अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
राज्य शासनाने रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान अद्यापही वाटप झाले नाही. परिणामी, तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. दुष्काळी उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित बँक व अधिकाऱ्यांना आदेशित करावे, अन्यथा रेणा मध्यम प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा रेणापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने ३१ जानेवारी रोजी देण्यात आला होता. निवेदनाची दखल न घेतल्याने सोमवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यासाठी संघटनेेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ते रेणा मध्यम प्रकल्पात उतरले.
दरम्यान, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड, तालुकाध्यक्ष अमोल गोडभरले, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, विश्वास कुलकर्णी, सुरज विटकर, दत्ता शिंदे, चंद्रकांत शिंदे, सचिन राठोड, राहुल गोडभरले, महादू गोडभरले, नवनाथ तिरुके, नितिन कलमे, अतुल राठोड, शरद राठोड, गणेश नाईक, भीमा वाघे, पप्पू जाधव, अमोल राठोड आदी सहभागी झाले होते.
३९ कोटींचा प्रस्ताव...
दुष्काळी अनुदानासाठी शासनाकडे जवळपास ३९ कोटी ५५ लाखांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसील कार्यालयाच्या वतीने प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.