मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लातूरात जिल्हाधिकाऱ्यांचा कामगारांशी संवाद
By आशपाक पठाण | Updated: April 2, 2024 17:47 IST2024-04-02T17:46:48+5:302024-04-02T17:47:16+5:30
जिल्हाधिकारी म्हणाल्या, कामगारांनी आपला हक्क बजावावा

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लातूरात जिल्हाधिकाऱ्यांचा कामगारांशी संवाद
लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी मंगळवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असंघटीत कामगारांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी अनमोल सागर, स्वीप समितीचे नोडल अधिकारी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, स्वीप कक्षाचे रामेश्वर गिल्डा यावेळी उपस्थित होते.
मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा-ठाकूर घुगे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात लोककला पथक, प्रभातफेरी, पालक मेळावे यासारख्या विविध माध्यमांतून मतदार जनजागृती करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज जागतिक ऑटीझम दिनानिमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असंघटीत कामगारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मत अमूल्य असून सर्वांनी ७ मे रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पथनाट्याद्वारे मतदानाविषयी माहिती देण्यात आली.