लातूर जिल्हा परिषदेच्या १८ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
By संदीप शिंदे | Published: September 28, 2023 11:27 AM2023-09-28T11:27:49+5:302023-09-28T11:27:57+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रस्तावाला मंजुरी
लातूर : जिल्हा परिषदेच्या १८ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून, सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने या प्रस्तावास मंजूर दिली. यामध्ये प्राथमिकमधील १०, माध्यमिक ७ आणि दिव्यांग गटातील १ शिक्षकाचा समावेश आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
दरवर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार शिक्षण विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे २ सप्टेंबर रोजी शिक्षकांची यादी पाठवली होती. मात्र, त्यास मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, सोमवारी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.
प्राथमिक विभागातून माधव मटवाड, प्रभावती वडजे, रचना पुरी, रणजित घुमे, प्रेमदास राठोड, किशन बिराजदार, सुरेश सोळुंके, प्रवीण काळे, विवेक डोंगरे, विजयकुमार कोरे यांना तर माध्यमिक विभागातून राजकुमार कांबळे, महादेव शिंदे, विठ्ठल केंद्रे, संगीता आगलावे, बालाजी वाघमारे, जयप्रकाश महालिंगे, सरस्वती नागमोडे आणि दिव्यांग गटातून दमयंती हिपरगे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, लवकरच पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.