लातुरातील विभागीय क्रीडा संकुल, ४०० मीटरचा सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅशकोर्टही अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:42 PM2023-08-29T13:42:18+5:302023-08-29T13:42:18+5:30

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : लातूरचे जिल्हा क्रीडा संकुलही कधी होणार हायटेक ?

Divisional Sports Complex at Latur, 400m synthetic runway, squash court also under construction | लातुरातील विभागीय क्रीडा संकुल, ४०० मीटरचा सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅशकोर्टही अधांतरी

लातुरातील विभागीय क्रीडा संकुल, ४०० मीटरचा सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅशकोर्टही अधांतरी

googlenewsNext

- महेश पाळणे
लातूर :
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडापटूंचा ठिकठिकाणी गौरव होतो. लातूर जिल्ह्यालाही खेळाडूंची वैभवशाली परंपरा आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील असंख्य खेळाडूंनी लातूरचे नाव देशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला शासन, स्थानिक प्रशासन नेहमीच पाठबळ देत आले आहे. याच धर्तीवर पुढच्या काळातही युवा खेळाडूंचे भवितव्य घडविण्यासाठी जिल्ह्यात मंजूर असलेले विभागीय क्रीडासंकुल, ४०० मीटरचा धावनपथ आणि अजूनही अधांतरी असलेला स्क्वॅशकोर्ट कार्यान्वित होणे आवश्यक आहे. 

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंच्या समस्यांवर आणि उत्कृष्ट सुविधांवर प्रकाश टाकला जावा, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंचे दैनंदिन सराव करण्याचे मुख्य ठिकाण असलेले क्रीडा संकुल खेळाडूंबरोबरच नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आहे. तिथे पावसाळा वगळता सर्वांनाच धुळीचा प्रचंड त्रास होतो. परिणामी, मैदानात पाणी शिंपडण्याची कायमस्वरूपी यंत्रणा आवश्यक आहे. वॉकिंग ट्रॅकवरही नियमित स्वच्छता झाली पाहिजे, अशी अपेक्षा खेळाडू व्यक्त करीत आहेत.

भिजत घोंगडे किती दिवस?
विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीचे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार आहे, त्यावर निर्णय कधी होईल, असा प्रश्न क्रीडापटू व्यक्त करीत आहेत. जिल्हा क्रीडा संकुलात स्क्वॅशकोर्टला मंजुरी देण्यात आली. मात्र, त्याचे काम सुरू झालेले नाही. ४०० मीटरचा सिंथेटिक धावनपथ आवश्यक आहे. जे पदक विजेते मैदानी खेळाडू आहेत, त्यांनाच सरावासाठी अडचण होत आहे.

बास्केटबॉल कोर्ट सिंथेटिक होणार...
जिल्हा क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळाच्या मैदानाची दुरुस्ती असून, हे मैदान सिंथेटिक होणार आहे. ४०० मीटरचा धावनपथही सिंथेटिक करण्याचा क्रीडा विभागाचा प्रयत्न असून, प्रमाणित कुस्ती व जिम्नॅस्टिक हॉलही उभारला जाणार आहे. - जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडाअधिकारी, लातूर

क्रीडामंत्र्यांकडून अपेक्षा...
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे लातूर जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे खेळाडूंना विभागीय क्रीडासंकुल, सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅश कोर्ट यासह अद्ययावत मैदाने आणि एकूणच हायटेक क्रीडासंकुल साकारले जाईल, अशी अपेक्षा आहे. बालेवाडीच्या धर्तीवर लातूर आणि उदगीरचे क्रीडा संकुल विकसित करू, असे आश्वासन क्रीडामंत्री बनसोडे यांनी दिल्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

Web Title: Divisional Sports Complex at Latur, 400m synthetic runway, squash court also under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.