बाबासाहेबांसारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका - श्रीपाल सबनीस
By admin | Published: February 25, 2017 08:51 PM2017-02-25T20:51:45+5:302017-02-25T20:51:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले
Next
>ऑनलाइन लोकमत
जळकोट (जि़लातूर), दि. 25 - कोणतेही महापुरुष हे एका जाती धमार्पुरते मर्यादित नसतात. त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केलेले आहे़ त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जळकोट येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आंबेडकरी विचार साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन खा़डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाले. मंचावर प्रा.डॉ. माधव गादेकर, स्वागताध्यक्ष संग्राम कदम, साहित्यिक विलास सिंदगीकर, उपनगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, बालाजी केंद्रे, मन्मथअप्पा किडे, अर्जुन आगलावे, ललिता सबनीस, नगरसेवक शिवानंद देशमुख, रमाकांत रायेवार, सोमेश्वर सोप्पा, जगन्नाथ मैलारे, मंगला बनसोडे, ललिता गायकवाड, कॉ. राजीव पाटील, विश्वनाथ चाटे, विठ्ठल चंदावार, संजय जेवरीकर, गणेश कापसे, बालाजी पडोळे, प्रा.रा.ना. पस्तापुरे, रामदास केदार यांची उपस्थिती होती.
श्रीपाल सबनीस म्हणाले, मानवतावादाची प्रेरणा सर्व धर्मात असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु संत कबीर होते. महात्मा गौतम बुद्धांचा विचार अहिंसावादी आहे. म्हणून सहिष्णुता महत्वाची आहे. डॉ. बाबासाहेबांनी १९३५ पर्यंत हिंदू धर्माला साद घातली. मात्र त्यांची हाक, करुणा, अडचण कोणी हिंदू ऐकू शकला नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्माकडून अपेक्षा करणे सोडून दिले. बाबासाहेबांनी हिंदुत्ववादाचे समर्थन कधीच केले नाही, असेही ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर जगभरातील राष्ट्रांनी त्यांचे विचार स्वीकारले आहेत़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोटाळ्यांमुळेच कमळ फुलले असे सांगून नोटाबंदी व सर्जिकल स्ट्राईकचे त्यांनी कौतुक केले.
खा. गायकवाड म्हणाले, सबनीस यांचे साहित्य वास्तववादी असून बाबासाहेबांचे विचार समाजात पोहोचविण्यासाठी आंबेडकरी साहित्य संमेलनाची गरज आहे.
यावेळी सत्कारमूर्ती कवी विलास सिंदगीकर, स्वागताध्यक्ष संग्राम कदम, चंदशेखर कळसे, एम. जी. मोमीन आदींची भाषणे झाली. तत्पूर्वी विलास सिंदगीकर यांच्या आनंदगाणी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. माधव वाघमारे यांनी तर आभार प्रा. सी.एम. कांबळे यांनी मानले़
गांधी आणि बुद्धांचा विचार अहिंसावादी
संघाचे मुकुट असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेल्यावर गांधी आणि बुद्ध यांचा जय जयकार करतात. कारण हे दोन्ही महापुरुष अहिंसावादी होते. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचविले असेही सबनीस म्हणाले़