धुराच्या लोटामुळे गुदमरतोय डॉक्टरांसह रुग्णांचा श्वास; कचरा जळतोय पण...

By आशपाक पठाण | Published: May 25, 2024 06:58 PM2024-05-25T18:58:56+5:302024-05-25T19:01:52+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात दुर्गंधी.

Doctors and patients are suffocating due to smoke | धुराच्या लोटामुळे गुदमरतोय डॉक्टरांसह रुग्णांचा श्वास; कचरा जळतोय पण...

धुराच्या लोटामुळे गुदमरतोय डॉक्टरांसह रुग्णांचा श्वास; कचरा जळतोय पण...

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात कचरा जाळण्याचा प्रकार वारंवार होत आहे. परिणामी, रुग्णांसह इतरांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त कचरा आणि त्यात धुराचे लोट पसरत असल्याने या भागातील नागरिकही वैतागले आहेत. मनपा प्रशासनाने उभारलेला कचरा डेपो रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे. शनिवारी दिवसभर कचऱ्याच्या धुराचे लोट सुरूच होते. लातूर शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच भेडसावत आहे. महापालिकेकडून वेळेत कचरा उचलला जात नसल्याने अनेकजण रिकाम्या जागेत कचरा आणून टाकतात. काही ठिकाणी ढीग झाला की त्याला जाळून टाकले जाते, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालगत रेल्वेच्या रिकाम्या जागेत मनपाने जणू कचरा डेपोच केला आहे. याठिकाणी टाकलेला कचरा वेळेत उचलला जात नाही, या भागातील अनेक हॉटेलसह विविध आस्थापनांचा कचरा रिकाम्या जागेत आणून टाकला जातो. दुर्गंधी वाढली की तो पेटवून दिला जातो. मागील काही महिन्यांपासून कचरा जाळल्याने येणाऱ्या धुराच्या लोटामुळे रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, रुग्ण त्यांचे नातेवाईकही त्रस्त झाले आहेत. महापालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी होणारी घुसमट थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दहा दिवसांत दुसऱ्यांदा आग
रेल्वेच्या जागेत असलेल्या कचरा डेपोला मागील दहा दिवसांत दुसऱ्यांदा आग लागली आहे. एकदा आग लागली की दोन दिवस धुराचे लोट अन् दुर्गंधीही वाढते. १४ मे रोजी सायंकाळी आग लागली होती. रात्री उशिरा मनपाकडून आग विझविण्यात आली. मात्र, वारंवार कचरा जळत असताना त्यावर उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून धुरामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात आणून दिले. मात्र, पत्र देऊन दहा दिवस लोटले तरी त्यावर कसलीही कारवाई झाली नाही.

वसतिगृहाच्या पाठभिंतीला कचरा डेपो 
वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या वसतिगृहाच्या पाठभिंतीला कचरा डेपो उभारण्यात आला आहे. याठिकाणी विविध भागांतून आणलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून मुख्य कचरा डेपोकडे नेला जातो. त्यामुळे या भागात मोकाट श्वान, वराहांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कचरा पेटला की धुराचे लोट पसरतात. यात नागरिकांचा श्वास कोंडत आहे. एकदा आग लागली की जवळपास २४ तासांपेक्षा अधिक वेळ कचरा धुमसत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Doctors and patients are suffocating due to smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर