फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन

By हरी मोकाशे | Published: October 4, 2023 05:28 PM2023-10-04T17:28:21+5:302023-10-04T17:28:51+5:30

फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन

Don't break up, stay united; Manoj Jarang's appeal to the community members | फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन

फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन

googlenewsNext

लातूर : मी तुमचा अन् तुम्ही माझे आहात. समाजच माझा मायबाप आहे. त्यांच्याशी गद्दारी करणे माझ्या रक्तात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी ही ओळख जपेन. आणखी काय सांगू? माझ्यावर विश्वास ठेवा. आरक्षणाची लढाई आता निर्णयाप्रत येवून पोहचली आहे. फुट नको एकजूट कायम ठेवा. आरक्षण मिळविणारच…. अशी भावनिक साद मराठा आरक्षणाचा लक्षवेधी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी येथे सकल मराठा बांधवांना घातली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित मराठा गाठीभेटी दौरा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाशिवाय मराठा समाजाच्या लेकरांची होणारी परवड थांबावी अन् त्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून आम्ही आंतरवली सराटीत लोकशाही मार्गाने उपोषण करीत होतो. कसलाही अपराध नसताना लाठ्या- काठ्या घालून रक्तबंबाळ करण्यात आले. अनेक तरुणांच्या शरीरात गोळ्या घुसल्या. आजही ते उपचाराखाली आहेत. या हल्ल्याने आमचे अवसान गळेल असे सरकारला अन् यंत्रणेला वाटले असेल. परंतु, आमच्यात हिम्मत आली अन् मी माझ्या उपोषणाची धार अधिक तीव्र केली. शेवटी सरकारला आमच्यापर्यंत यावे लागले. फोडाफोडीचे सर्व प्रकार अजमावण्यात आले. कानात बोला कोपऱ्यात चला असा आर्जव केला. परंतु मी माझी निष्ठा सोडली नाही. ४० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आता केवळ २० दिवस राहिलेत. यादरम्यान सरकारकरवी फोडा फोडीचा प्रयत्न होवू शकतो. परंतु, तसे होऊ देऊ नका.

५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या अथवा लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग करुन तेही आरक्षण ५० टक्क्यांच्या आत द्या, असे पर्यायही सरकारला दिले आहेत. १४ नोव्हेंबरला आंतरवाली सराटीत होणाऱ्या मराठा आरक्षण सभेस जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून यावे असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेल्या सहा जणांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप सोळंके यांनीही सभेसाठी येण्याचे आवाहन केले.

आत्महत्या करु नका...
आम्ही तुमच्या जीवनात समाधानाचा दिवस जागावा म्हणून आरक्षणाची लढाई लढत आहोत अन् अशावेळी हिम्मत धरण्याऐवजी अनेक युवक मरणाला कवटाळत आहोत. तुम्हीच नसाल तर हे आरक्षण मिळवून काय करायचे? असा सवाल करीत आत्महत्या करू नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

Web Title: Don't break up, stay united; Manoj Jarang's appeal to the community members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.