शाळा बंद करु नका; प्राथमिक शिक्षक समितीचे सत्याग्रह आंदोलन
By संदीप शिंदे | Published: October 10, 2022 04:53 PM2022-10-10T16:53:07+5:302022-10-10T16:53:52+5:30
० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरु आहेत.
लातूर : शिक्षण विभागाकडून ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविण्यात आली आहे. या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु असून, त्याला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सोमवारी दुपारपासून धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.
शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण प्रत्येक बालकास त्याच्या घरापासून एक किमी अंतराच्या आत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची आहे. प्रत्येक बालकास प्राथमिक शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. मात्र, ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरु आहेत. हा निर्णय झाल्यास वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये, या मागणीसाठी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
तसेच मागण्यांचे निवेदन उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांना देण्यात आले. आंदोलनात शिक्षक नेते शिवाजीराव साखरे, ब्रिजलाल कदम, किशनराव बिरादार, अरुण सोळंके, विकास पुरी, संजय सुर्यवंशी, माधवराव फावडे, रंजित चौधरी, संजय कदम, दिनेश जाधव, तुकाराम पाटील प्रकाश मरतुळे आदींसह लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील शिक्षक सहभागी होते.