"पराभव मनाला लावून घेऊ नका, त्याची भरपाई करु...", पंकजा मुंडेंनी सचिनच्या कुटुंबियांना दिला धीर
By राजकुमार जोंधळे | Published: June 18, 2024 01:00 PM2024-06-18T13:00:25+5:302024-06-18T13:01:49+5:30
येस्तारच्या मुंढे कुटुंबियांची घेतली भेट!
किनगाव (जि. लातूर) : माझ्या पराभवामुळे तुम्ही निराश झाल्यास कसे होईल? मी पराभव मान्य केला आहे. तुम्हीही मान्य करून येत्या विधानसभेकडे लक्ष द्या. हा पराभव जास्त मनाला लावून घेऊ नका. त्याची भरपाई आपण करु, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे सांगितले.
अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन कोंडिबा मुंढे (३८) याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यास सचिन गेला असा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी दिल्लीतून सचिनच्या कुटुंबियांना बोलून धीर दिला होता. सोमवारी त्यांनी येस्तार येथे येऊन कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा त्या भाऊक झाल्या होत्या.
डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते. मी कायम आपल्या कुटुंबासोबत आहे. माझ्या पराभवामुळे कुणीही निराश होऊ होऊन जीवनयात्रा संपवू नये. तुम्ही आत्महत्या करणार असाल तर मग मी घरी बसते. तसेच कोणी आत्महत्येसंदर्भात बोलत असल्यास त्यांना समजावून सांगावे. तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे. सर्वांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असेही माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी जि.प. सदस्य त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे, अयोध्या केंद्रे, अक्षय मुंदडा, रामप्रभू मुंडे, नाथराव केंद्रे, हणमंत देवकते, अशोक मुंडे, चंद्रसेन पाटील, डीवायएसपी मनीष कल्याणकर, सपोनि भाऊसाहेब खंदारे आदी उपस्थित होते.