जेष्ठ नागरिकाने लघुशंकेसाठी उघडला दरवाजा; संधी साधत चोरट्याने घरात घुसून चाकूने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 01:00 PM2021-01-11T13:00:36+5:302021-01-11T13:01:27+5:30
जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.
चाकूर ( लातूर ) : शहरातील एक ७८ वर्षीय जेष्ठ नागरिक लघू शंकेसाठी घराबाहेर आले होते. या संधीचा फायदा घेत एक चोरटा घरात घूसून दडून बसला. त्यानंतर झोपेच्या तयारीत असलेल्या या वृध्दावर चोरट्याने चाकूने हल्ला केला. पोटावर , गळ्यावर वार केल्याने जेष्ठ नागरिक गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस स्टेशन रोड लगत मन्मथ काशीनाथआप्पा शेटे(७८) यांचे घर आहे. या घरात शेटे व त्यांच्या पत्नी राहतात. रविवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास मन्मथ शेटे हे लघूशंकेसाठी घराबाहेर आले होते. त्यावेळी लाईट गेलेली होती. अंधाराचा फायदा घेत एक चोरटा घरात शिरला. लघूशंका करून शेटे घरात आले. दार लावून आतून कुलूप लावले.१० ते १५ मिनिटाने लपून बसलेल्या चोरट्यांने शेटे यांच्या अंगावर बसून आलमारीची चावी मागितली. दोघांत बाचाबाची झाली. तेव्हा चोरट्याने शेटे यांच्या पोटात मानेवर चाकूचा वार केला. तोंड दाबून धरले. त्यात तोंडाला पण इजा झाली आहे.
भीतीने शेटे मारू नकोस काय पाहिजे ते घे असे म्हणाले. शेटे यांनी एक चावीचा जुडगा दिला. रक्तबंबाळ झालेले शेटे यांना पाहून त्या चोरट्याने कुलूप काढून पोबारा केला. शेटे यांनी आरडाओरड केला असता शेजारी धावून आले. शेटे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास रात्रीच ताब्यात घेतले आहे. असे पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट यांनी सांगितले.