अनाथ मुलांसाठी झटणाऱ्या शुभांगी शिवपुजे-मित्रा यांना मदर टेरेसा ग्लोबल पुरस्कार
By संदीप शिंदे | Updated: December 21, 2024 19:00 IST2024-12-21T18:59:56+5:302024-12-21T19:00:49+5:30
डॉ. शुभांगी शिवपुजे-मित्रा यांनी हा सन्मान पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना समर्पित केला

अनाथ मुलांसाठी झटणाऱ्या शुभांगी शिवपुजे-मित्रा यांना मदर टेरेसा ग्लोबल पुरस्कार
लातूर : लंडनस्थित मूळच्या लातूर येथील डॉ. शुभांगी शिवपुजे -मित्रा यांना नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल मदर टेरेसा अवार्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले. स्वर्ण भारत परिवार संस्थेद्वारे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार डॉ. मित्रा यांना अनाथाश्रमांतील आणि दुर्बल मुलांच्या सहाय्याबद्दल प्रदान करण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील कासारशिरशी येथील डॉ. शुभांगी मित्रा लंडनमध्ये वकिली व्यवसायात आहेत. त्यांनी स्वत: कर्करोगाची झुंज देत महिला हक्कांसाठी मोलाचे योगदान दिले. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संपर्कात आल्यानंतर अनाथ मुलांसाठी कार्य केले.
डॉ. मित्रा माईंच्या मानसकन्या असून, मार्गदर्शनामुळे त्यांचे जीवन बदलले. दरम्यान, माईंच्या कन्या ममता सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मित्रा या सप्तसिंधु संस्थेच्या आंतरराष्ट्रीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट आणि प्रतिष्ठित युनायटेड नेशन्सचा ॲम्बेसिडर फाॅर पीस पुरस्कार मिळाला तसेच युकेच्या संसदेतही यावर्षी त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. शुभांगी शिवपुजे-मित्रा यांनी हा सन्मान ज्या महिला आई होऊ शकत नाहीत अशा सर्वांना तसेच त्यांच्या आदर्श पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना समर्पित केला आहे.