जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीची धास्ती; प्रशासकीय इमारतीत साफसफाई!
By हरी मोकाशे | Published: October 6, 2023 05:36 PM2023-10-06T17:36:39+5:302023-10-06T17:36:55+5:30
कचरा, दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास
लातूर : जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारतीत कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत होती, त्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास होत होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाहणीसाठी येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने शुक्रवारी इमारतीतील एका विभागाने आपले साहित्य उचलत स्वच्छता मोहीम राबविली.
प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये आहेत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने नागरिकांची रेलचेल असते. तीन मजली कार्यालयात अनावश्यक साहित्य पडल्याचे दिसून येते. शिवाय, काही ठिकाणी कचरा पडल्याने आणि स्वच्छतागृहाची नियमितपणे साफसफाई करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर जिल्हा सांख्यिकी कार्यालय असून काही महिन्यांपूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे जुने फर्निचर इमारतीत बाजूस टाकण्यात आले होते.दरम्यान, जिल्हाधिकारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयास भेटी देणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने सदरील कार्यालयाने सफाईची मोहीम हाती घेतली. तासाभरात मजुरांकडून स्वच्छता करून घेतली.
इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्या...
सदर विभागाने जुने फर्निचर काढल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे आढळून आले. शिवाय, दारूच्या रिकाम्या बाटल्याही पहावयास मिळाल्या. त्यामुळे काही कामानिमित्ताने ये-जा करीत नागरिक आचंबित होऊन पाहत होते. काही नागरिक तर शासकीय कार्यालयाच्या इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्या कशा काय असा सवाल उपस्थित करीत होते.
कर्मचारी- मजुरांत वादावादी...
जुने लाकडी साहित्य उचलण्यासाठी सदरील कार्यालयातील कर्मचाऱ्याने तीन- चार मजुरांना बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे मजूर काही वेळात काम पूर्ण करती होते. तेव्हा तेथील कर्मचारी आणखीन काम सांगत असल्याने वादवादी सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. हे पाहून उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.