पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:16 PM2021-12-04T17:16:34+5:302021-12-04T17:17:17+5:30
लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला
रेणापूर (जि. लातूर) : पाेलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने उडविल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारस रेणापूर परिसरात घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने मयत तरुण बिभीषण बाबुराव भाेसले याचे पाेलीस हाेण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले आहे.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर येथील ओमनगर येथे वास्तव्याला असलेला तरुण बिभीषण बाबुराव भाेसले (३०) हा गेल्या काही महिन्यांपासून पाेलीस भरतीची तयारी करत हाेता. दरम्यान, ताे शनिवारी पहाटेच्या सुमारास लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर मैदानी, शाररीक तयारी करत हाेता. नेहमीप्रमाणे ताे घरातून धावत लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर नेहरु नगरनजीक एका हाॅटेलजवळ आला असता, पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बिभीषण भाेलसे यास अज्ञात वाहनाने जाेराची धडक दिली. या अपघातात डाेक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अधिक तपास रेणापूर पाेलीस करीत आहेत.
अर्ध्यावर राहिले स्वप्न...
बिभीषण भाेसले हा गेल्या काही महिन्यांपासून नियमित पाेलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मैदानी चाचणीसाठी मेहनत करत हाेता. दरराेज पहाटे आणि सांयकाळच्या सुमारास सराव करत हाेता. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास ताे धावत असताना, भरधाव वाहनाने त्याला उडविले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिभीषणचा जागची मृत्यू झाला. घटनास्थळी रेणापूर पाेलिसांनी भेट देवून पाहणी केली आहे. या अपघाताने बिभीषणचा अर्ध्यावरतीच डाव माेडला आहे. या घटनेने रेणापूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.