चालकाने सहा लाखांच्या साड्यांसह ऑटाे पेटविला; कारण अस्पष्ट, लातुरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: April 14, 2023 07:30 PM2023-04-14T19:30:54+5:302023-04-14T19:31:10+5:30
ऑटाेचालकाने कशासाठी? काेणत्या कारणासाठी ऑटाे पेटवून दिला, याचा तपास लातूर ग्रामीण पाेलिस करत आहेत
लातूर : राजस्थानातील एका व्यापाऱ्याच्या साड्या घेऊन जाणारा ऑटाे चालकानेच पेटविल्याची घटना लातुरातील साेनवती ते साराेळा राेडवर घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात ऑटाे चालकाविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, राजस्थानातील व्यापारी रणवीरसिंग रामसिंग चहार (वय ३३, रा. तुमकी, ता. राभट, जि. चेरू) हे लातुरातील साळे गल्लीत ट्रान्स्पाेर्ट एजन्सी चालवितात. शिवाय, ऑटाेतून साड्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी ऑटाे चालक म्हणून लातुरातील बरकतनगर येथील रहिवासी राजकुमार खंडागळे यांना ठेवले हाेते. दरम्यान, १२ एप्रिल राेजी लातूरनजीकच्या साेनवती-साराेळा राेडवर ऑटाेतून (एम.एच. २४ जे ९३३६) पंधरा गठ्ठ्यांची वाहतूक केली जात हाेती. यावेळी ऑटाेचालक राजकुमार लहू खंडागळे याने हा ऑटाे पेटवून दिला. यामध्ये ५ लाख ९५ हजार ७१८ रुपयांच्या साड्या आणि ५० हजार रुपयांचा ऑटाे असा एकूण ६ लाख ४५ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. ऑटाेचालकाने कशासाठी? काेणत्या कारणासाठी ऑटाे पेटवून दिला, याचा तपास लातूर ग्रामीण पाेलिस करत आहेत, अशी माहिती पाेलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी दिली.
याबाबत रणवीरसिंग रामसिंग चहार यांनी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुरुवारी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी राजकुमार खंडागळे याच्याविराेधात गुरनं. ११२/ २०२३ कलम ४३५ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस हेड काॅन्स्टेबल जगदाळे करत आहेत.