चालकांकडे काेट्यवधींचा दंड थकला; ४४१ जणांना ‘काळ्या यादी’ची शिक्षा
By राजकुमार जोंधळे | Published: April 2, 2024 11:56 PM2024-04-02T23:56:53+5:302024-04-02T23:57:02+5:30
पाेलिसांची कारवाई : पाच हजारांपेक्षा अधिक दंड
लातूर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर माेठ्या प्रमाणावर गत वर्षभरात कारवाई करण्यात आली असून, ज्या वाहनांवर किमान पाच हजारांपेक्षा अधिक दंड थकला आहे, अशा ४४१ वाहनधारकांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ई-चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. गत वर्षभरात जवळपास सात हजार वाहनांवर कारवाई करून, तब्बल ७५ लाखांपेक्षा अधिक दंड करण्यात आला आहे. यामध्ये अनेक वाहनधारकांना पाच हजारांपेक्षा अधिक दंड करण्यात आला आहे. त्यांच्याकडून हा दंड भरण्याबाबत दुर्लक्ष कले जात आहे. वारंवार सूचना देऊनही हा दंड भरण्यात आला नाही. त्यांना नाेटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांनी थकलेला दंड भरला नाही. लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने अशा ४४१ वाहनधारकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांना सतत कारवाईचा दंडुका दाखविला जाताे. मात्र, टप्प्याटप्प्याने वाहनावर करण्यात आलेल्या दंडाची रक्कम वाढत जाते आणि ताे भरला जात नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही जण दंड भरताे म्हणून ते भरतच नाहीत, असा प्रकार समाेर आला आहे. आता किमान पाच हजारांपेक्षा अधिकचा दंड थकविणाऱ्या वाहनधारकांना पाेलिसांनीच हिसका दाखविला आहे. त्यांना काळ्या यादीचीच शिक्षा करण्यात आली आहे.
वाहनांवर माेठा दंड; भरण्याकडे दुर्लक्ष
एका-एका वाहनावर किमान दहा ते पंधरा वेळा दंड करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सतत करण्यात आलेल्या दंडाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. थकलेला दंड भरण्याबाबत पाेलिसांकडून सूचना करण्यात आलेल्या आहेत. शिवाय, वेळाेवेळी नाेटीस बजावण्यात आली आहे. याकडे ४४१ वाहनधारकांनी दुर्लक्ष केले आहे. आता त्यांच्या वाहनांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, असे पाेलिस निरीक्षक गणेश कदम म्हणाले.