चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट

By हरी मोकाशे | Published: July 27, 2023 06:58 PM2023-07-27T18:58:13+5:302023-07-27T18:59:19+5:30

निलंगा- बोरसुरी मार्गावरील मुलांची व्यथा

driver's obstinacy; Students march to school in the rain due to non-stopping of the bus | चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट

चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट

googlenewsNext

निलंगा : ग्रामीण भागातील विद्यार्थी अन् प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसची सेवा आहे. मात्र, निलंगा- बोरसुरी मार्गावरील बसचालकाने आठमुठेपणा करीत गुरुवारी येळनूर, गुंजरगा येथे बसच थांबविली नाही. त्यामुळे एसटीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पावसातच तीन- चार किमी पायी जाऊन शाळा गाठावी लागली.

तालुक्यातील अनसरवाडा येथील शिवाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयात येळनूर व गुंजरगा येथून ३० ते ३५ विद्यार्थी दररोज ये- जा करतात. या गावातील मुलांसाठी निलंगा- बोरसुरी ही बस आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची साेय होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून या मार्गावरील बसचालकाने आडमुठेपणा करीत येळनूर, गुंजरगा येथे बसच थांबविली नाही. त्यामुळे एसटीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा बुडू नये म्हणून पावसातच पायपीट करावी लागली.

शाळेत आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक दत्ता शाहीर, संस्थाचालक टी.टी. माने यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर एसटीचे आगारप्रमुख अनिल बिडवे यांना लेखी निवेदन दिले. निवेदनावर ज्योती बालकुंदे, संजीवनी शिंदे, नम्रता गोबाडे, जान्हवी गोबाडे, संजीवनी पांचाळ, कौशल्य शिंदे, नौशाद सय्यद, प्रियंका गोबाडे, सोनाली गोबाडे, आयशा शेख, प्रांजली गोबाडे, मनीषा नणंदकर, ज्योती गोबाडे, लक्ष्मी पाटील, दिशा शिंदे, दिव्या शिंदे, वैष्णवी गोबाडे, दिलशाद सय्यद, साक्षी पाटील, राधिका शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सातत्याने होतेय मनमानी...
यापूर्वीही १५ जून रोजी चालकाने एसटीचा मार्ग बदलल्याने येथील विद्यार्थ्यांची शाळा बुडाली होती. तेव्हा आगार प्रमुख अनिल बिडवे यांनी पुन्हा अशी गैरसोय होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, सातत्याने असे प्रकार घडत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगून यापुढे रास्तारोको करण्याचा इशाराही दिला.

चौकशी केली जाईल...
घडलेल्या या प्रकाराबद्दल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- अनिल बिडवे, आगारप्रमुख.

शैक्षणिक नुकसान...
बसचालकांकडून नेहमीच असे प्रकार घडत आहेत. तक्रार केल्यानंतर तात्पुरती सोय केली जाते. त्यानंतर पुन्हा जैसे परिस्थिती राहत आहे. अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- दत्ता शाहीर, मुख्याध्यापक.

Web Title: driver's obstinacy; Students march to school in the rain due to non-stopping of the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.