अमली पदार्थाची फॅक्टरी; परप्रांतीयांसह चाैघांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: May 26, 2024 08:53 AM2024-05-26T08:53:34+5:302024-05-26T08:54:10+5:30
पाेलिसांनी अमली पदार्थ निर्मिती करणारी फॅक्टरीच उघड केली आहे.
राजकुमार जाेंधळे, औराद शहाजानी (जि. लातूर) : पत्र्याच्या शेडमध्ये अमली पदार्थ निर्मिती करून, विक्री करणाऱ्या तिघा परप्रांतीयांसह एका शेतकऱ्याविराेधात औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी अमली पदार्थ निर्मिती करणारी फॅक्टरीच उघड केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील एका शेतकऱ्याने अमली पदार्थ निर्मिती करण्यासाठी तिघांना आपल्या शेतात शेड भाड्याने दिले हाेते. दरम्यान, या शेडमध्ये तिघा परप्रांतीयांकडून नशा येईल अशा पद्धतीचे अमली पदार्थ बनविण्यात येत हाेते. त्याची इतर ठिकाणी विक्रीही केली जात हाेती. तिघांनी गत काही दिवसांपासून पत्र्याच्या शेडमध्ये अमली पदार्थ निर्मिती करून विक्री करत असल्याची खबऱ्यामार्फत औराद शहाजानी पाेलिसांना कुणकुण लागली. पाेलिसांनी शेतात छापा मारला असता, फॅक्टरीच असल्याचे उघड झाले. यावेळी माेठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात मलय्या हानमय्या गुत्तेदार (रा. पुणे), मलय्या शिवय्या गुत्तेदार (रा. गुलबर्गा), दर्शन हनमय्या गुत्तेदार (रा. शिरसागी जि. कलबुर्गी) यांच्यासह शेतकरी राजू ऊर्फ व्यंकट गाेराबा गाेबाडे (रा. अनसरवाडा ता. निलंगा) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.