कोरडी आभाळमाया..!
By Admin | Published: July 21, 2014 11:49 PM2014-07-21T23:49:59+5:302014-07-22T00:16:16+5:30
रमेश शिंदे , औसा पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.
रमेश शिंदे , औसा
पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना उलटला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये अजूनही पेरण्या झाल्या नाहीत. पेरण्या झालेले ५० टक्के क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. जे उगवले त्यांना आता पावसाची गरज आहे. परंतु, दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री चांदणे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर दुष्काळाचे काजवे चमकू लागले आहेत़
जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये एकवेळा बऱ्यापैकी तर दोन-तीन वेळा अल्प पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. त्यातही सोयाबीनच्या बियाणाने मोठा दगा दिला. तालुक्यातील जवळपास २५ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा दिसून येत आहे. तालुक्यावर दिवसभर दाटून येणारे ढग बरसत नाहीत. ते आता पावसाचे नव्हे, तर दुष्काळाचे संकेत देऊ लागले आहेत. पाणीटंचाई कायम आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. आता पाऊस नाही आला तर काय होणार, या भीतीने सर्वांच्याच मनात काहूर निर्माण झाले आहे.
औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. पेरण्यांना तब्बल महिनाभर उशीर होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने काळ्या आईची ओटी भरली. ७० ते ८० हजार हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या उरकल्या; पण आता पाऊसच नाही. वर्षभर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाने छळले. आधी अवकाळी, त्यानंतर गारपीट तर आता पुन्हा दुष्काळाचे गडद सावट दिसत आहे़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जवळचे सर्व काही संपले. बँका आणि खाजगी सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरी हतबल होताना दिसत आहे.
मागील वर्षी औसा तालुक्यात २१ जुलैपर्यंत २६१ मि.मी. पाऊस झाला होता. पण यावर्षी मात्र आजपर्यंत केवळ १२४.१४ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ८१३.०९ मि.मी. इतकी आहे. यावर्षी पावसाळ्याचे जवळपास ४० ते ४५ दिवस संपले, तरीही अत्यंत तोकडा पाऊस झाला आहे. तालुक्यातील आशिव, मातोळा, उजनी या पट्ट्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे दिवसभर ढग असले तरी ढगांची कोरडीच माया दिसत आहे. सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी-तांड्यांवर १९ अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. अजून चार दिवस पाऊस नाही झाला तर आणखी गावांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पाऊस नसल्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे. दिवसभर आभाळात ढगांची गर्दी असते. पाऊस मात्र पडत नाही. रात्री चांदण्या दिसतात. दिवसभर आभाळात ढग दिसत असले तरी ‘ढगांची कोरडी माया, दुष्काळाची गडद छाया’ असे चित्र आता औसा तालुक्यात स्पष्ट दिसत आहे.
चारा आणि पाणीटंचाईला प्राधान्य...
सध्याच्या परिस्थितीसंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर म्हणाले की, जिल्हास्तरावरून दुष्काळाचा सामना करण्याचे नियोजन तयार आहे. सध्या तालुक्यातील पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाराटंचाई या दोन प्रश्नांवर दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे भारस्कर यांनी सांगितले.