दुषित पाण्यामुळे मदनसुरी गावात ३५ जणांना गॅस्ट्रोची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 06:51 PM2017-09-02T18:51:36+5:302017-09-02T18:52:44+5:30
मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत.
निलंगा ( लातूर ) , दि. 2 : मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत. दरम्यान, रुग्णांना गावातीलच आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच तालुका आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे़.
निलंगा तालुक्यातील मदनसुरी गावातील जुन्या भागातील नागरिकांना शनिवारी सकाळपासून अचानक जुलाब, उलट्याचा त्रास सुरु झाला़. त्रास वाढल्याने रुग्ण गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ़ योगेश पाटील यांनी रुग्णांवर उपचार केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ़. श्रीनिवास कदम व सहाय्यक उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़बरुरे यांनी तात्काळ आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली़.
दुपारपर्यंत ३५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले़. उपकेंद्रात पांडुरंग जाधव, रागिणी जाधव, तानाजी जाधव, पुजा माळी, संगीता माळी, उषा जाधव, सुमित जाधव, राणी पाटील, समाधान जाधव, हेमा जाधव, पवन माने, रवि माने, मनीषा माळी, नारायण निटुरे, सुभाष माळी, शाहुराज माने, धनराज माने आदी रुग्णांवर उपचार सुरु आहेत़
डबक्यातील व्हॉल्वमुळे समस्या़
मुख्यतः वार्ड क्ऱ ३ मधील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे़. या भागात ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीचा व्हॉल्व डबक्यात आहे़. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचा आरोप शिवसेनेचे शिवाजी माने यांच्यासह नागरिकांनी केला आहे़.