उदगिरात संततधार पावसामुळे जलसाठा वाढला, पिके बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:24 AM2021-09-06T04:24:10+5:302021-09-06T04:24:10+5:30
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. दरम्यान, पिकांपुरता पाऊस होत गेल्याने पिकेही ...
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. दरम्यान, पिकांपुरता पाऊस होत गेल्याने पिकेही बहरली होती. परंतु, मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतातील बहरलेली पिके सुकून जात होती. काही भागात सोयाबीनला फूल लागत असताना पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अधूनमधून पडणाऱ्या भीज पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि खरिपातील पिकांना तात्पुरता आधार मिळाला होता.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून संपूर्ण तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीनसह सर्व पिके बहरली. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होऊ लागले आहे. तालुक्यातील नदी-नाल्यांना पाणी वाहू लागले आहे. पाझर, साठवण तलावातील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
तालुक्यात आतापर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस व कंसात आतापर्यंतच्या पावसाची नोंद : उदगीर १५ (७९४), नागलगाव १३ (६१९), मोघा ७० (७६६), हेर ३४ (६५९), वाढवणा १५ (७८४), देवर्जन ६० (६३७), तोंडार २९ (६४८) मिमी एवढा पाऊस झाला आहे.