पावसाअभावी पिके कोमेजू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:45+5:302021-07-04T04:14:45+5:30
औराद शहाजनी : मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर गत आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे ...
औराद शहाजनी : मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर गत आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अन्य काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आणि तापमान वाढल्याने उगवलेली पिके कोमेजू लागली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दरम्यान, गत आठवड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या पावसावर पेरणीला वेग आला होता. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जूनमध्ये केवळ दोनदाच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यानंतर पाऊस नसल्याने ओलावा टिकून राहिला नाही. त्यातच वारे वाहू लागल्याने आणि कडक उन्हामुळे पाण्याअभावी पिके माना टाकू लागली आहेत.
खरीप पिकांबरोबरच भाजीपाल्याचीही हीच अवस्था झाली आहे. थ्रिप्स, करपा, भुरीसारखे रोग भाजीपाला, फळबागांना त्रासदायक ठरत आहेत. पावसात खंड पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महागामोलाची बी-बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, साठवण तलावात पुरेसा मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही. काही शेतकरी उपलब्ध पाण्यावर स्प्रिंकलरने पाणी देत आहेत.
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप पाऊस झालेला नाही. त्यातच कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. कधी ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी जोराच्या वाऱ्यामुळे ढग पुढे निघून जात आहेत.