पावसामुळे महामार्गावर खड्डेच खड्डे, वाहन चालविणे कसरतीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:40+5:302021-09-02T04:43:40+5:30

चाकूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील काही महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्यात आले. परंतु, छोटे खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने आणि पावसामुळे ...

Due to the rain, there are potholes on the highway, driving is difficult | पावसामुळे महामार्गावर खड्डेच खड्डे, वाहन चालविणे कसरतीचे

पावसामुळे महामार्गावर खड्डेच खड्डे, वाहन चालविणे कसरतीचे

Next

चाकूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील काही महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्यात आले. परंतु, छोटे खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने आणि पावसामुळे त्या खड्ड्यांचा आकार वाढला आहे. रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना वाहन चालविणे धोकादायक झाले असून अपघात वाढले आहेत. परिणामी, दुचाकीस्वार चाकूर ते लातूर हा प्रवास टाळत आहेत. तसेच चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहन चालविणे ही तारेवरची कसरत ठरत आहे.

चाकूर- लातूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डयांची खोली जवळपास ९ ते १५ इंच तर रुंदी तीन ते सात फुट ऐवढी आहे. खड्ड्यात वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. खड्डे चुकविण्याचा प्रयत्न केला तर अपघात होत आहेत. शहरातील जुने बसस्थानकाजवळ खड्डे पडल्याने ते चुकविताना वाहतुकीची कोंडी होत आहे. पुढे पूल, पेट्रोलपंप, न्यायालय, तहसील येथील रस्त्यावरही खड्डेच खड्डे आहेत. खड्डयांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार पडून अपघात होत आहेत.

तुळजापूर- लातूर- चाकूर- अहमदपूर- नांदेड रस्ता राज्य शासनाने केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला. त्यानंतर या मार्गावर कोट्यवधी रुपये खर्चून हॉटमिक्सचे काम करण्यात आले. हे काम करण्यापूर्वी निविदा काढून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने त्यावरील हॉटमिक्सचे काम फारसे तग धरले नाही. परिणामी, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.

चाकुरातील शासकीय विश्रामगृह ते विश्व शांतीधाम मंदिर आणि चाकूर ते तहसील कचेरी हा रस्ता दुपरी नसल्याने येथे हॉटमिक्सचे काम झाले नव्हते. त्याची साईडपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गने केंद्र सरकारकडे पाठविला. मात्र, तो अद्याप लालफितीत अडकला आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

लातूररोडच्यासमोर घरणी गावानजिक, शासकीय विश्रामगृह, नळेगाव टी पॉईंट, नांदगाव, आष्टा, महाळंग्रा, ममदापूर, कोळपा पुलानजिक असे लातूरपर्यंत खड्डेच- खड्डे आहेत. खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदार होत नाही. त्यामुळे करण्यात आलेले काम पुन्हा उखडत आहे.

खड्ड्यांनजिक लाल फलक...

या मार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होत आहेत. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज येत नाही. सतत अपघात होत असल्याने खड्डयाजवळ अजय घोडके, योगेश पाटील, किशोर आंधुरे यांनी लाल फलक लावले आहेत.

तात्काळ सूचना करु...

या मार्गासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांना पत्र देऊन जुन्या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहन चालकांसाठी सोयीचे करावे. खड्ड्यांमुळे अपघात होत असून त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे.

- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.

दुरुस्तीसाठी रस्त्यावर येऊ...

राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांमुळे अपघात होत आहेत. रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे अजित घंटेवाड, अजय धनेश्वर, विठ्ठल झांबरे, परमेश्वर नवरखेले, लक्ष्मण डाके, दत्ता सूर्यवंशी, सत्यनारायण कोळेकर यांनी सांगितले.

Web Title: Due to the rain, there are potholes on the highway, driving is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.