सततच्या पावसाने दुबार पेरणीची वेळ आली, कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली
By संदीप शिंदे | Published: July 26, 2022 06:29 PM2022-07-26T18:29:02+5:302022-07-26T18:30:09+5:30
दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे पेरणी करता आली नाही.
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील जामगा येथील बालाजी रवींद्र बिरादार (४५) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून साेमवारी (दि. २५) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बालाजी बिरादार यांनी आपल्या तीन एकर शेतात खरिपाची पेरणी केली हाेती. सततच्या पावसामुळे व गाेगलगायीचा प्रादुर्भाव हाेऊन पिकाचे नुकसान झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली हाेती. दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे पेरणी करता आली नाही. यातच संसाराचा गाडा कसा चालवावा या चिंतेने त्यांनी साेमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली असून, पुढील तपास पाेलीस हेडकाॅन्स्टेबल गिते करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दाेन मुले, मुलगी असा परिवार आहे.