आवक घटल्याने तुरीची उच्चांकी भावाकडे धाव! सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये दर
By हरी मोकाशे | Published: April 10, 2024 07:28 PM2024-04-10T19:28:33+5:302024-04-10T19:28:45+5:30
बुधवारी केवळ १ हजार १९० क्विंटलपर्यंत आवक झाली होती.
लातूर: तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढली असल्याने तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीस सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कमाल भाव १२ हजार ३१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याने एप्रिलमध्येच तुरीची उच्चांकी भावाकडे धाव होत असल्याचे दिसून येत आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळतो म्हणून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील तसेच कर्नाटक, तेलंगणा या सीमावर्ती भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. गत खरीपात विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्यांना उशीर झाला होता. जिल्ह्यात एकूण ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. तुरीचे सरासरी क्षेत्र १ लाख १ हजार ७१६ हेक्टर क्षेत्र असले तरी केवळ ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला होता. तो ६३ टक्के असा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने व किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट झाली. परिणामी, बाजार समितीत आवक घटली आहे.
हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत आवक...
गत खरीप हंगामात पेरा कमी होण्याबराेबरच उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची आवक अल्प प्रमाणात होत आहे. सध्या दररोज जवळपास एक हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी केवळ १ हजार १९० क्विंटलपर्यंत आवक झाली होती.
एका आठवड्यात हजार रुपयांची वाढ...
बुधवारी तुरीस १२ हजार ३१ रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला. सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये तर किमान १० हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. विशेषत: एका आठवड्यात जवळपास एक हजार रुपयांनी दर वाढले असल्याचे दिसून येत आहे.
आणखी दर वाढणार...
तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवकही घटली आहे. त्यामुळे दालमिलसाठी पुरेशा प्रमाणात तूर उपलब्ध होत नाही. शिवाय, जुना साठाही नाही. त्यामुळे दरवाढ होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या कालावधीत तुरीला उच्चांकी जवळपास १२ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, यंदा एप्रिलमध्येच दर वाढले आहेत. आगामी काळात आणखीन दरवाढ होईल. - सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, दालमिल असो., उदगीर.
सोयाबीनचे दर स्थिर...
शेतमाल - आवक - साधारण दर
गुळ - २८१ - ३५००
गहू - १०४ - २८००
हायब्रीड - १०४ - २३००
ज्वारी - २६८ - ३०२५
पिवळी - ११९ - ४०००
हरभरा - ५४५६ - ५९००
तूर - ११९० - ११८००
करडई - १०७ - ४६७०
सोयाबीन - ८६५७ - ४७००