अतिवृष्टी, किडीला वैतागून शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला नांगर
By हरी मोकाशे | Published: August 25, 2022 01:53 PM2022-08-25T13:53:51+5:302022-08-25T13:54:17+5:30
पेरणी, बियाणे, खत, मशागत व वेळोवेळी केलेली फवारणी असा आतापर्यंत अंदाजे ४० हजार हजार रुपयांचा खर्च केला होता.
बेलकुंड (जि. लातूर) : सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून बचावलेल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला. वेळोवेळी फवारण्या करूनही सोयाबीनवरील कीड कमी होत नसल्याने वैतागलेल्या बेलकुंड (ता. औसा) येथील खंडू उबाळे शेतकऱ्याने जवळपास एक हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविले.
सोयाबीन पिकावर पैसा, गोगलगायचा प्रादुर्भाव झाला. आता यलो मोझॅकचा प्रादुर्भावही झाला. परिणामी, हाती उत्पन्न येण्याची आशा मावळली. त्यामुळे खंडू उबाळे या शेतकऱ्याने आपल्या एक हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले. उबाळे यांनी एक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. पहिली पेरणी केली. त्यावेळी पावसाने व दुसऱ्यांदा पेरणी केली त्यावेळी गोगलगायींनी पीक उद्धवस्त केल्याने त्यांनी नांगर फिरवला. पेरणी, बियाणे, खत, मशागत व वेळोवेळी केलेली फवारणी असा आतापर्यंत अंदाजे ४० हजार हजार रुपयांचा खर्च केला होता. मात्र, उत्पन्नाची आशा मावळल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.