पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

By हरी मोकाशे | Published: July 1, 2024 06:46 PM2024-07-01T18:46:23+5:302024-07-01T18:47:10+5:30

लातूर जिल्ह्यातील ३२१ गावांवर जलसंकट

Due to expiry of water supply period, tankers on site, acquisition also stopped; Ghagar on the side during the rainy season! | पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

लातूर : मृग बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय, पाणीटंचाईची दाहकता कमी झाली. मात्र, अद्यापही १४ टँकर आणि ४४५ अधिग्रहणे सुरुच होती. दरम्यान, पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने सोमवारपासून टँकर जागेवच थांबले आहेत तर अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ३२१ गावांतील नागरिकांना कडेवर घागर घेऊन फिरावे लागत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे हिवाळ्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. ती दूर करण्यासाठी जानेवारीअखेरपासून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला. यंदा तापमान वाढल्याने होरपळ होत होती. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवली. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात रोहिण्या आणि सुरुवातीस मृग बरसल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात टंचाई निवारणासाठीचे १४ टँकर बंद करण्यात आले. त्याबरोबर ९३ अधिग्रहणे बंद झाली.

टंचाई निवारणासाठी जूनअखेरपर्यंत मुदत...
जिल्हा परिषदेच्या लघु व पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही आराखडा तयार करुन मंजुरी घेतली होती. ३० जूनपर्यंत ३२१ गावांना ४४५ अधिग्रहणाद्वारे आणि १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. मात्र, १ जुलै रोजी मुदत संपल्याने अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत.

अहमदपुरात सर्वाधिक सुरु होती अधिग्रहणे...
तालुका - टंचाईग्रस्त गावे
लातूर - ०१
रेणापूर - ५०
उदगीर - २९
अहमदपूर - ९६
चाकूर - ४०
देवणी - ०९
जळकोट - २१
निलंगा - ५९
शिरुर अनं. - १६
एकूण - ३२१

टँकरच्या पाण्यावर ४० हजार नागरिक...
जिल्ह्यात रविवारपर्यंत १४ टँकर सुरु होते. त्यात टेंभूर्णी, ब्रह्मवाडी, हसर्णी, किनगाव, चाटेवाडी/ हंगेवाडी, सिरसाटवाडी/ मोळवणवाडी/ सोनवणेवाडी, अजनीवाडी, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा/ अतनूर तांडा, उमरगा रेतू, महापूर तांडा, मोहगाव, डोंगरशेळकी, महादेववाडी, बामाजीचीवाडी/ जायबाचीवाडी येथील ३९ हजार २४१ नागरिकांची तहान टँकर होती.

प्रस्ताव आल्यास शासनाकडे मागणी...
जूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरले आहे. त्यानुसार पाहणी करुन काही ठिकाणची अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले. दरम्यान, अधिग्रहण, टँकरची मुदत ३० जून रोजी संपल्यामुळे १ जुलैपासून अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांनी अधिग्रहण, टँकरचा प्रस्ताव सादर केल्यास तो शासनाकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.
- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा.

Web Title: Due to expiry of water supply period, tankers on site, acquisition also stopped; Ghagar on the side during the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.