नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ
By राजकुमार जोंधळे | Published: September 13, 2022 01:54 PM2022-09-13T13:54:32+5:302022-09-13T13:55:20+5:30
रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे
लातूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड ते तिरुपती एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, अधिकारी आणि यंत्रणेच्या नियोजनाअभावी तिरुपतीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामीण भागातील यात्रेकरूंच्या अडचणीत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यांना तिरूपती दर्शनासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. या रेल्वेचे वेळापत्रक किमान तीन महिने आधीच जाहीर करावे, अशी मागणी त्रस्त प्रवाशातून होत आहे.
मराठवाड्यातून तिरुपतीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यासाठी थेट तिरुपतीसाठी धावणारी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. त्यानुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड येथून व्हाया परळी वैजनाथ - उदगीर - भालकी - बिदर - विकाराबाद - तिरूपती रेल्वे (क्रमांक ०७६३३) आणि परतीच्या प्रवासाला तिरूपती ते नांदेड एक्स्प्रेस (क्रमांक ०७६३४) सुरु करण्यात आली आहे. मात्र, ही रेल्वे कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी प्रवासी भारमनाचा प्रामुख्याने विचार होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आणि उत्पन्नाचा आलेख समाधानकारक राहिल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू करता येणार आहे. यासाठी, रेल्वे प्रशासनाने या रेल्वेचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याची गरज आहे. प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट दोन दिवसांपूर्वीपर्यंत कन्फर्म होत नसल्याने भाविकांचा जीव टांगणीला लागला आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. शिवाय, रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
अन्यथा रायलसिमा एक्सप्रेसचा पर्याय...
परळी वैजनाथ, उदगीर, भलकीसह बिदर जिल्ह्यातील भाविकांना जाण्यासाठी पूर्वी विकाराबाद रेल्वे स्थानक येथे जाऊन, रायलसिमा एक्स्प्रेस रेल्वेने तिरुपतीला जावे लागत होते. आता थेट नांदेड येथून तिरुपती एक्स्प्रेस सुरु झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, ही रेल्वे किती दिवस चालवली जाते, हे यंत्रणेच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. ही रेल्वे योग्य भारमानासह कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी नियोजनाची गरज आहे.