दरात घसरण झाल्याने सोयाबीनची आवक घटली !

By संदीप शिंदे | Published: February 4, 2023 11:40 AM2023-02-04T11:40:28+5:302023-02-04T11:42:13+5:30

लातूर बाजार समिती : ५२७० रुपयांचा सर्वसाधारण दर

Due to the decline in the price, the import of soybeans decreased! | दरात घसरण झाल्याने सोयाबीनची आवक घटली !

दरात घसरण झाल्याने सोयाबीनची आवक घटली !

googlenewsNext

लातूर : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर घसरले असल्याने आवकही मंदावली असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी ८२४० क्विंटलची आवक झाली. त्याला ५३९९ रुपयांचा कमाल, ५०५१ रुपयांचा किमान तर ५,२७० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, मागील महिनाभरात दरात झालेल्या घसरणीतून आवक वर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, जवळपास ५ लाख हेक्टरवर सोयाबीन होते. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने सोयाबीन घरीच साठवूण ठेवले आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात सोयाबीनची १० ते १३ हजार क्विंटलची आवक होत होती. त्याला ५५८० रुपयांपर्यंत दर मिळत होतो. मात्र, जानेवारीच्या शेवटीपासून दर ५ हजार ३०० रुपयांपर्यंत आल्याने त्याचा परिणाम आवक वर झाला आहे. विशेष म्हणजे तेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनच्या किमतीवर ही त्याचा परिणाम झाला आहे.

बाजार समितीमध्ये शुक्रवारी गूळ ५६० क्विंटल, गहू १९९, रब्बी ज्वारी ८, पिवळी ज्वारी ९, मका १०, हरभरा ५६५, मूग ३१, तूर, २१४२, उडीद ४७ तर करडीची ३९ क्विंटलची आवक झाली आहे. दरम्यान, तुरीला समाधानकारक दर मिळत असल्याने आवकही मध्यम असल्याचे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात अशी होती आवक आणि दर...
शेतमाल आवक दर
सोयाबीन ८२४० ५२७०
तूर २१४२ ७३००
हरभरा ७६५ ४६००
गुळ ५६० ३२००
गहू १९९ ३२००

दर दरवाढीची किती दिवस वाट पाहणार...
जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक आहे. तर रब्बी मध्ये शेतकरी हरभऱ्याचा पेरा करतात. दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती खरिपामध्ये अपेक्षित उत्पन्न हाती पडलेले नाही. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने घरीच ठेवले असून, आणखीन किती दिवस दरवाढीची वाट पाहावी लागणार असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

तुरीला ७३०० रुपयांचा सर्वसाधारण दर...
येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी २१४२ क्विंटल तुरीची आवक झाली. त्याला ७४११ रुपयांचा कमाल, ६७६० रुपयांचा किमान तर ७ हजार ३०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दरात घसरण झाली असली तरी तुरीचे दर स्थिर असल्याचे बाजारातील चित्र आहे. दरम्यान, सध्या हरभऱ्याची ही आवक ७६५ क्विंटलवर पोहचली असून, त्याला ४६०० रुपयांचा सर्वसधारण दर मिळत आहे.

Web Title: Due to the decline in the price, the import of soybeans decreased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.