वाढत्या उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा; सोमवारपासून अंमलबजावणी
By संदीप शिंदे | Published: March 9, 2023 05:51 PM2023-03-09T17:51:21+5:302023-03-09T17:54:47+5:30
प्राथमिक शिक्षण विभागाचे आदेश; सोमवारपासून होणार अंमलबजावणी
लातूर : मार्च महिना सुरु झाला असून, जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गतच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची विविध शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार सोमवार १३ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत.
आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १ आणि शनिवारी सकाळी ७.३० ते ११ या वेळेत शाळा भरणार आहेत. तर एकाच इमारतीत दोन सत्रात भरणाऱ्या शाळा या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येऊ नये. १३ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची अंमलबजावणी करावी अशा सुचनाही शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी केल्या आहेत. दरम्यान, सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.