ई-केवायसी रखडली; ३३७० शेतकरी ‘प्रोत्साहन’पासून वंचित!
By संदीप शिंदे | Published: February 17, 2023 10:11 PM2023-02-17T22:11:21+5:302023-02-17T22:15:01+5:30
कर्जमुक्ती योजना : ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान वितरित
- संदीप शिंदे
लातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत ८६ हजार ५८० जणांना २८९ कोटी ६४ लाखांचे अनुदानही दिले आहे. मात्र, ३ हजार ३७० शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे हे शेतकरी प्रोत्साहनच्या लाभापासून वंचित आहेत.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ८४ हजार ९५६ आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांची यादी प्रोत्साहन अनुदानासाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून, यामध्ये १ लाख ३० हजार ३८४ जणांचा समावेश आहे. यातील १ लाख २७ हजार १४ जणांनी ई-केवायसी केलेली आहे. त्यापैकी ८६ हजार ५८० शेतकऱ्यांच्या खात्यावर २८९ कोटी ६४ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
पहिल्या यादीत ४८ हजार शेतकऱ्यांची नावे आली होती. यातील ४५ हजार जणांच्या खात्यावर १५४ कोटी वर्ग करण्यात आले. दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली असून, त्यातील ४१ हजार जणांच्या खात्यावर १३२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या तीन वर्षांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही तिसरी यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे ५४ हजार शेतकरी या यादीच्या प्रतीक्षेत आहेत.
७३२ शेतकऱ्यांनी मांडल्या तक्रारी...
यादीत नाव आल्यास संबंधित शेतकऱ्यास बँकेत संपर्क साधावा लागतो. तेथे विशिष्ट क्रमांक देऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर प्रोत्साहनापोटी मिळणारी रक्कम मंजूर असल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान मिळालेले आहे.
तहसीलस्तरावर २१५ तक्रारी प्राप्त...
जिल्ह्यात एकूण ७३२ तक्रारी प्राप्त आहेत. त्यानुसार ९५ तक्रारी जिल्हास्तरावर आहेत. २७४ तक्रारी प्रलंबित आहेत, तर तहसीलस्तरावर २१५ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तहसीलस्तरावर १४८ तक्रारी रखडलेल्या असून, त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.
ई-केवायसी करण्याचे आवाहन...
ज्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव आले आहे. त्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी केल्यावरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या ३३७० शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे आवाहन उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.
अशी आहे प्रोत्साहनची आकडेवारी...
पात्र शेतकरी - १,८४,९५६
पहिली यादी - ४८,०००
दुसरी यादी - ८३,०००
विशिष्ट क्रमांक - १,३०,३८४
ई-केवायसी झालेले - १,२७,०१४
ई-केवायसी रखडली - ३,३७०
अनुदान मिळालेले - ८६,५८०
अनुदान रक्कम - २८९ कोटी ६४ लाख