आधी दिली अपघातात मृत्यूची खबर, तपासात खून उघड; डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:46 IST2024-12-14T13:43:23+5:302024-12-14T13:46:16+5:30
अपघातात तरुणाच्या मृत्यूची खबर देणारा डॉक्टर निघाला खूनी; लातूरात गुन्हा दाखल

आधी दिली अपघातात मृत्यूची खबर, तपासात खून उघड; डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर : जबर मारहाणीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात एका डाॅक्टरसह अन्य एकाविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, प्रेमला उर्फ प्रेमा भारत डोंगरे (वय ५५, रा. गाेढाळा ता. रेणापूर, जि. लातूर) या सध्या इंडिया नगरातील बालाजी बरुरे यांच्या घरी वास्तव्याला आहेत. फिर्यादीचा मुलगा बाळू भारत डाेंगरे (वय ३५) याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती ऑयकाॅन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डाॅ. प्रमाेद घुगेंकडून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पाेलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नाेंद केली. दरम्यान, काही संशयास्पद बाबी समाेर आल्यानंतर पाेलिसांनी याबाबतची कसून चाैकशी केली असता तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या.
याबाबत मयताची आई प्रेमला डाेंगरे यांच्याशी पाेलिसांनी संपर्क केला. त्यांनी घडलेला घटनाक्रम पाेलिसांसमाेर कथन केला. त्यानुसार मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचे समाेर आले. डाॅ. प्रमाेद घुगे आणि अनिकेत मुंडे (दोघे रा. आयकाॅन हाॅस्पिटल, रेणापूर नाका, लातूर) या दाेघांनी संगनमत करून पैसे मागण्याच्या कारणावरून बाळू भारत डाेंगरे या तरुणाला जबर मारहाण केली. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची तक्रार मयताच्या आईने दिल्याचे पाेलिसांनी सांगितले.
याबाबत गुरनं. ४८९ /२०२४ कलम १०३ (१), ३ (५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप सागर हे करीत आहेत. या प्रकरणातील दाेन्ही आराेपींचा पाेलिस शाेध घेत आहेत.