लातूरमध्ये अनधिकृत वाळू उपशावर महसूलची पहाटे कारवाई; ११ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 07:21 PM2021-02-23T19:21:04+5:302021-02-23T19:21:49+5:30
कोळपा शिवारात महसूलच्या पथकाने पहाटे ५.३० ते सकाळी ११ यावेळेत मोहिम राबवून जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत.
लातूर : तालुक्यातील कोळपा शिवारातील एका साठवण तलावातून अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार स्वप्नील पवार यांनी सापळा रचून चार पथकांची नियुक्ती केली. मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तलावाकडे जाणारी चारही रस्ते ब्लॉक करून एकाचवेळी तब्बल ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोळपा शिवारात सोनवतीनजीक असलेल्या साठवण तलावात माती बाजूला सारून त्याखाली निघत असलेल्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने स्वतः तहसीलदार स्वप्नील पवार यांनी पुढाकार घेत चार पथक तयार केले. सदरील पथकाने मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोळपा शिवार गाठले. तलावाकडे जाणारे चारही रस्ते अडविण्यात आले. यावेळी तलावातून अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ टिप्पर व ६ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून सदरील वाहने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत. त्यांच्याकडून जवळपास १३ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. याबाबत दंडाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली.
तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार राजेश जाधव, श्रावण उले, भिमाशंकर बेरूळे यांची वेगवेगळी चार पथके होती. त्यांच्यासोबत जवळपास २३ कर्मचारी सहभागी होती. त्यात मंडळ अधिकारी त्रिंबक चव्हाण, तलाठी चंद्रशेखर फड, संदेश राठोड, प्रनित बोघणे, गजानन मुळे, मनोज मलवाड, डी.एस. हिप्परकर, विठ्ठल काळे, राहुल माळवदकर, सुनिल लाडके, विलास कलाकुसर, रणजित पानगावकर, महेश हिप्परगे, सचिन तावशीकर, चालक गोविंद शिनगिरे आदींचा समावेश होता.
पहाटे ५.३० ते ११ पर्यंत मोहिम...
कोळपा शिवारात महसूलच्या पथकाने पहाटे ५.३० ते सकाळी ११ यावेळेत मोहिम राबवून जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दंड म्हणून जवळपास १३ लाख रूपये वसूल करण्यात येतील, असे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी सांगितले. वाळूची वाहने पळून जाऊ नयेत, यासाठी चारही रस्त्याने पथक उभे करण्यात आल्याने एकाचवेळी ११ वाहने पकडण्यात आली आहेत.