किल्लारीला भूकंपाचा सुक्ष्म धक्का; नागरिकांत भीती
By हरी मोकाशे | Published: November 19, 2022 12:46 PM2022-11-19T12:46:35+5:302022-11-19T12:47:07+5:30
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासुरी परिसरात ६ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत भूगर्भातून गुढ आवाज येऊन भूकंपाचे आठ सौम्य धक्के जाणवले होते.
लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील येळवट, सिरसल, मंगरुळ, एकाेंडीस शुक्रवारी रात्री २.०७ वा. च्या सुमारास भूकंपाचा सुक्ष्मा धक्का जाणवला. यात कुठलेही नुकसान झाले नसले तरी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळी नागरिक भूकंपाची चर्चा करीत होते. भूकंपाच्या या धक्क्यामुळे १९९३ च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासुरी परिसरात ६ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत भूगर्भातून गुढ आवाज येऊन भूकंपाचे आठ सौम्य धक्के जाणवले होते. या ठिकाणाची जिल्हाधिकाऱ्यांसह नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभाग आणि दिल्लीच्या पथकाने पाहणी करुन सतर्कतेच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, औराद शहाजानी आणि आशिव येथे भूकंपमापन केंद्र बसविण्यात आले.
जवळपास दीड महिन्याने पुन्हा किल्लारीस शुक्रवारी रात्री २.०७ वा. च्या सुमारास भूकंपाचा सुक्ष्म धक्का जाणवला. त्याची लातूर, औराद शहाजानी आणि आशिव येथील भूकंपमापन केंद्रावर नोंद झाली असून तो धक्का २.४ रिस्टर स्केलचा होता. यात कुठलेही नुकसान झाले नाही, असे किल्लारी ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी सांगितले.
नागरिकांनी सतर्क रहावे...
शुक्रवारी रात्री २.०७ वा. किल्लारीस २.४ रिस्टर स्केलचा सुक्ष्म धक्का जाणवला. तेथील नागरिकांशी संवाद साधून माहिती घेण्याबरोबरच सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी कच्च्या घरात राहू नये. भूकंपाचा धक्का जाणवताच खुल्या जागेत थांबावे. किल्लारी केंद्रबिंदू आहे.
- साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.