निलंगा तालुक्यातील हासोरीत भूकंपाचे धक्के? भयभीत ग्रामस्थ रस्त्यावर
By आशपाक पठाण | Published: September 6, 2022 11:34 PM2022-09-06T23:34:56+5:302022-09-06T23:35:46+5:30
रात्री १०.१२ मिनिटाला मोठा आवाज.
निलंगा (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हासोरी (बु.) गावात मंगळवारी रात्री १०.१२ वाजण्याच्या भूगर्भातून अचानक जोराचा आवाज झाल्याने लोक भूकंपाच्या भितीने काही क्षणातच रस्त्यावर आले. जमीन हादरत असल्याचे लक्षात येताच सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ झाली.
हासोरी बु. गावात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अनेकजण झोपेची तयारी करीत होते. भुगर्भातून अचानक जोरदार हादरे सुरू झाले. काहीतरी जमिनीखालून जात असल्याचा भास होत असल्याने अनेकांनी आरडाओरड सुरू केली. काही तात्काळ पटांगणात धावत सुटले. हा धक्का झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पशूधनही सुरक्षितस्थळी हलविले.
सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सौम्य धक्का जाणवला असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. यासंदर्भात गावातील ज्ञानेश्वर बरमदे म्हणाले, जोरदार आवाज झाल्याने सर्वजण घराबाहेर धावत सुटले. ३० सप्टेंबर १९९३ च्या किल्लारी भूकंपाची आठवण ज्येष्ठ नागिरकांनी कुटुंबियांना करून दिली. यासंदर्भात निलंग्याचे नायब तहसीलदार घनश्याम आडसुळ यांना माहिती दिली. निलंग्याचे नायब तहसीलदार घनश्याम आडसुळ म्हणाले, आवाज नेमका कशाचा होता याबाबतची माहिती घेतली जात आहे. त्यापद्धतीने प्रशासन हासोरी बु. गावात चौकशी करणार आहे.
हासोरी बु. गावात भूगर्भातून आवाज झाला आहे. नेमका भूकंप आहे का याची माहिती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिली.