खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

By संदीप शिंदे | Published: August 25, 2023 06:19 PM2023-08-25T18:19:43+5:302023-08-25T18:20:05+5:30

साठा केलेले व्यापारी, विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना फटका; दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते.

edible oil imports decision hits Traders and farmer; no change in soyabean prices! | खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

googlenewsNext

उदगीर : केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे बाहेर देशातून आयात होत असलेल्या खाद्यतेलाचा परिणाम स्थानिक बाजारात दिसत आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. उलट बाजारात आवक कमी असतानासुद्धा मागील चार दिवसापासून सोयाबीनच्या दरात दिडशे रुपयाची घट झाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांनी दर वाढतील म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा केलेला आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांनीही दरवाढ होईल म्हणून सोयाबीन घरीच ठेवले आहे. परिणामी, आर्थिक नुकसान होत आहे.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालीच नाही. यासोबतच अनेक व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीचा सोयाबीनला मिळालेला उच्चांकी दर पाहता मिळेल त्या दरात सोयाबीन खरेदी करून गोदामात साठवणूक केली आहे. मागील वर्षाच्या हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचा दर ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल होता. दरवाढीच्या फायदा घ्यावा म्हणून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बाजारात टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालीच नाही.

हंगामाच्या मध्यात सोयाबीन ५ हजार ८५० प्रतिक्विंटलपर्यंत गेला. हा दर साधारणपणे दोन-तीन दिवस होता. त्यामुळे बहुतेक व्यापारी व शेतकऱ्यांनी इथून आता दर वाढेल असा अंदाज वर्तवित साठवणूक केली. याचा परिणाम बाजारातील आवक कमी होण्यावर झाला. परंतु प्रक्रियादार कारखानदाराकडून मागणी जेमतेम होत असल्यामुळे दर वाढ झाली नाही. मुळात सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक असल्यामुळे जागतिक घडामोडीचा यावर फार मोठा परिणाम होतो. खाद्य तेलाचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्याचा परिणाम बाहेर देशातून येणारे खाद्यतेल कमी दरामध्ये बाजारात उपलब्ध होत असल्याकारणाने प्रक्रियादार कारखानदारांनीसुद्धा सोयाबीन खरेदी करतेवेळी या बाबीचा विचार करून आवश्यक व मागणी पुरवठ्याचा हिशोब घालित सोयाबीन खरेदी केले. संपूर्ण हंगाम संपून गेला, यंदाच्या पेरण्या झाल्या तरी बाजारात आवक १ हजार ते १ हजार ५०० पोतपर्यंत खाली आली असल्याचे चित्र आहे.

उदगीरात ४ हजार ८५० रुपयांचा दर...
शुक्रवारी उदगीरच्या बाजारात ४८५० रुपयांपर्यंत सोयाबीनचा दर होता. क्विंटलमागे एक हजार रुपयाची घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी ५७०० ते ५८५० प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गोदामात सोयाबीन ठेवले आहे. गोदाम भाडे, येणारी तूट व इतर खर्च वजा जाता १०० पोत्यांमागे जवळपास सव्वा लाखांचे नुकसान होत आहे. लाखो क्विंटल सोयाबीन अनेक गोदामात विक्रीविना पडून आहे. हीच अवस्था शेतकऱ्यांची असून, दोघांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.

दर वाढण्याची शक्यता कमीच...
मागील वर्षीचा साठा व आंतरराष्ट्रीय बाजारातून कमी दरात खाद्य तेल बाजारात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना परवडेल अशा दराने बाजारात खाद्यतेल उपलब्ध व्हावे म्हणून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरात कुठलीही वाढ होण्याची शक्यता दिसून येत नाही, असे सोयाबीन प्रक्रियादार सागर महाजन यांनी सांगितले.

Web Title: edible oil imports decision hits Traders and farmer; no change in soyabean prices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.